बिल न दिल्यास ‘खरेदी केलेल्या वस्तू मोफत’ या रेल्वेच्या उपक्रमाकडे प्रवाशांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 11:21 PM2019-12-20T23:21:53+5:302019-12-20T23:22:05+5:30
बिल घेण्याचे प्रमाण अवघे १० टक्के : गाड्यांच्या वेळापत्रकामुळे प्रवाशांत निरुत्साह
ठाणे : रेल्वेस्थानकांवरील उपाहारगृहांतील अन्नपदार्थ खरेदी करताना बिल न दिल्यास खरेदी केलेले पदार्थ मोफत दिले जातील, असे रेल्वे प्रशासनामार्फत वारंवार सांगितले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात बिल घेण्यास वेळ नसल्याने रेल्वेच्या या उपक्रमाकडे प्रवाशांनी चक्क पाठ फिरवल्याचे दिसत आहे. ठाणे रेल्वेस्थानकात बिल घेण्याचे प्रमाण जवळपास १० टक्क्यांच्या पुढे जात नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
ठाणे रेल्वेस्थानकातून मध्य आणि हार्बर (वाशी-पनवेल) तसेच एक्स्प्रेस व मालगाड्या धावतात. दररोज ठाण्यातून मध्य रेल्वेच्या ७९० अप-डाउन लोकलसह ठाणे-वाशी-पनवेल या मार्गावर २४६ अप-डाउन तसेच १३२ अप-डाउन अशा एक्स्प्रेस धावतात. तसेच ठाण्यातून नियमित ३.५० लाख लोकल प्रवासी तिकिटांची विक्री होत आहे. या प्रवासीसंख्येसह पासधारक आणि एक्स्प्रेसने प्रवास क रणारे असे दिवसभरात ठाण्यातून जवळपास सात ते आठ लाख प्रवासी येजा करतात.
ठाणे स्थानकात एक ते १० ए असे ११ फलाट असून त्यांच्यावर एकूण १८ उपाहारगृहे आणि एक फूड प्लाझा आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने या उपाहारगृहधारकांकडून बिल न दिल्यास अन्नपदार्थ मोफत मिळतील, असे रेल्वे प्रवासात वारंवार कानांवर पडते. यानुसार, उपाहारगृहधारकांनीही मशीन लावून बिल देण्याची तयारी दर्शवली आहे. पेपरच्या रोलसाठी १५ रुपये जास्त मोजण्याचीही तयारी केली आहे. मात्र प्रवाशांना बिलासाठी वेळ नसल्याचे सांगितले जाते.
रविवारी तर शून्य प्रतिसाद : रेल्वेस्थानकावरील सर्वच उपाहारगृहांतून दिवसाला किती बिल देण्यात आलेले आहेत, याची माहिती दररोज ठाणे रेल्वे प्रशासनाकडून घेण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर ती माहिती पुढे मुंबईतील रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवली जाते. त्यातच बिल घेण्याचे प्रमाण हे साधारणत: १० टक्क्यांच्या आसपास पोहोचलेले आहे. मात्र, रविवारी हे प्रमाण जवळपास मायनसमध्येच दिसत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगितले जाते.
रेल्वेचा हा उपक्रम चांगला आहे. पण, गाडी गेल्यावर दुसरी गाडी कधी येईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे १० रुपयांचा एखादा अन्नपदार्थ घेतल्यानंतर त्याचे बिल घेणे शक्य नाही. ते अन्नपदार्थ घेऊन बिल न घेताच जाणेच योग्य ठरते. - सुशांत चव्हाण, प्रवासी