तीन कामगारांच्या मृत्यूप्रकरणी सचिवसह खजिनदाराला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 01:15 AM2019-05-12T01:15:17+5:302019-05-12T01:15:26+5:30
ढोकाळीनाका येथील प्राइड प्रेसिंडेन्सी लक्झेरिया या गृहसंकुलातील मलनि:सारण प्रक्रिया केंद्राच्या टाक्यांची सफाई करताना गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू झाला होता.
ठाणे : ढोकाळीनाका येथील प्राइड प्रेसिंडेन्सी लक्झेरिया या गृहसंकुलातील मलनि:सारण प्रक्रिया केंद्राच्या टाक्यांची सफाई करताना गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी दोन कंत्राटदारांना अटक केल्यानंतर शनिवारी सकाळी पोलिसांनी त्या सोसायटीच्या सचिवासह खजिनदारास अटक केली. अटक केलेल्या चौघांना शनिवारी ठाणे न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालीन कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मलनि:सारण प्रक्रिया केंद्रातील टाकी सफाई करण्याच्या कामाचा ठिकाणी हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणामुळे तीन कामगारांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कंत्राटदार वैभव पाटील आणि त्याचा भागीदार जितेंद्र खेर या दोघांना शुक्रवारी सायंकाळी अटक केली. तसेच त्या सोसायटीचे अध्यक्ष सुमन नरसाणा (४५), खनिजनदार सुनील कैचे (४३), सचिव हरभजन भाटिया (६९) या तिघांवरही कामाचा ठिकाणी हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा केल्याचा ठेपका ठेवून गुन्हा दाखल झाल्यानंतर खनिजदारसह सचिवाला अटक झाली. तर अध्यक्ष हे बाहेरगावी आहेत. त्यामुळे अटक झालेल्यांची संख्या चार झाली असल्याची माहिती कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी दिली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बी.एस. पवार करत आहेत.