तिजोरी ठणाणा, तरीही पदाधिकारी म्हणतात नवी कार आणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:54 AM2021-02-20T05:54:40+5:302021-02-20T05:54:40+5:30
ठाणे : कोरोनामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झालेला आहे. नगरसेवकांच्या प्रभागात मूलभूत सोयी-सुविधांसाठी निधी मिळत नाही. ठेकेदारांनी केलेल्या कामांची ...
ठाणे : कोरोनामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झालेला आहे. नगरसेवकांच्या प्रभागात मूलभूत सोयी-सुविधांसाठी निधी मिळत नाही. ठेकेदारांनी केलेल्या कामांची बिले अर्धीच निघत आहेत. असे असताना आता महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, स्थायी समिती सभापती, महिला बालकल्याण सभापती, माजिवडा मानपाडा आणि वर्तकनगर प्रभाग समिती सभापतींना आता नवी वाहने खरेदीचा मोह झाला आहे. यासाठी ७० लाखांचा निधीचा चुराडा केला जाणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव मंगळवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.
महापालिका हद्दीत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाची साथ सुरू झाली. ती रोखण्यासाठी लॉकडाऊन घेतला. त्यामुळे पालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर याचा परिणाम झाल्याचे दिसून आले. केवळ मालमत्ता आणि पाणीपुरवठा विभागाने पालिकेला सावरले आहे, तर इतर विभागांचे टार्गेटदेखील आयुक्तांनी कमी केले आहे. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविताना आयुक्तांनी अनेक मोठ्या प्रकल्पांना कात्री लावली आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पावरही याचे पडसाद उमटले आहेत. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ ठेवण्यासाठी प्रशासनाने काटकसरीचा अर्थसंकल्प सादर केला असून, यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प १२०० कोटी रुपयांनी कमी झाला आहे. टाळेबंदी आणि शिथिलीकरणानंतरही शहराची अर्थव्यवस्था रुळावर आली नसून आता ती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. तरीही महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे चित्न आहे. अशा परिस्थितीतही महापालिका पदाधिकारी नवे वाहन खरेदीची हौस भागवून घेत असल्याचे चित्न आहे. महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, स्थायी समिती सभापती संजय भोईर, महिला व बालकल्याण समिती सभापती, वर्तकनगर आणि माजिवाडा प्रभाग समिती अध्यक्ष अशी एकूण सात नवीन वाहने खरेदी करण्यात येणार आहेत. या सर्व पदाधिकाऱ्या केलेल्या मागणीच्या आधारे हा ७० लाखांचा प्रस्ताव तयार केला असून, तो स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.