मैदानांत बांधकाम बंदीचा वृक्ष प्राधिकरणाचा निर्णय; उद्यानांमध्ये २० टक्केच बांधकामाला परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 01:11 AM2020-01-15T01:11:17+5:302020-01-15T01:11:36+5:30
ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाची बैठक मंगळवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
ठाणे : ठाणे शहरात आधीच खेळाची मैदाने आणि उद्याने कमी राहिली आहेत. आहेत त्यांची अवस्था फारशी चांगली नाही. काही उद्याने आणि मैदानांच्या आड समाज मंदिर अथवा इतर काही कट्टे सुरु आहेत. ते आता उर्वरित मैदाने अथवा उद्यानांमध्ये असणार नाहीत. यापुढे उद्यानांमध्ये केवळ २० टक्के बांधकामाला परवानगी दिली जाणार असून, खेळाच्या मैदानांमध्ये कोणत्याही स्वरुपाचे बांधकाम होऊ दिले जाणार नसल्याचे मंगळवारी झालेल्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षेताखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत सदस्य विक्रांत तावडे यांनी या मुद्याला हात घातला. शहरातील उद्यानांची दूरवस्था झालेली आहे. खेळाच्या मैदानांच्या ठिकाणी बांधकामे होत आहेत. त्यामुळे उद्यानात फिरण्यासाठी येणाऱ्यांचा फारसा विरंगुळा होताना दिसत नाही. खेळाच्या मैदानांच्या ठिकाणीदेखील समाज मंदिर उभारण्याच्या नादात मैदानावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे यापुढे उद्यानांमध्ये कमीतकमी बांधकाम, म्हणजेच सिव्हील वर्क व्हावे, अशी मागणी त्यांनी केली. त्याअनुषगांने आयुक्तांनी उद्यानांमध्ये २० टक्केच बांधकामांना यापुढे परवानगी दिली जाईल, असे स्पष्ट केले. इतर कोणतेही बांधकाम उद्यानांत होणार नाही, याचीही काळजी घेण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. मैदानांमध्ये संरक्षक भिंतीखेरीज इतर कोणतेही बांधकाम यापुढे होणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
ठाण्यात लवकरच फ्लॉवर गार्डन; घोडबंदरला घेणार जागेचा शोध
नाशिक, कोलकाता, उटी आदी ठिकाणी फ्लॉवर गार्डन आणि बॉटनिकल गार्डन विकसित केले आहे. आता ठाण्यातही फ्लॉवर गार्डन विकसित करण्याची तयारी ठाणे महापालिकेने केली आहे. यासंदर्भात मंगळवारी झालेल्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय झालो. त्यामुळे बॉटनिकलच्या विद्यार्थ्यांनाही उद्यानाचा फायदा होऊ शकणार असल्याचे मत प्राधिकरण सदस्य नम्रता भोसले यांनी व्यक्त केले. त्यानुसार घोडबंदर परिसरात जागेचा शोध घेऊन पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाची बैठक मंगळवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विषयांच्या अनुषगांना भोसले यांनी हा मुद्दा उपस्थित केला. कोलकाता, उटी, नाशिक आदींसह देशाच्या बहुतेक महानगरांमध्ये अशा पद्धतीने उद्याने विकसित होत आहेत. ठाण्यात दरवर्षी वृक्षवल्लीच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारच्या जातीच्या आणि फुलांची ओळख होत असते. या प्रदर्शनाला ठाणेकरांचा दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळत असतो. परंतु,आता प्रदर्शन भरवतानाच खºया अर्थाने अशा प्रकारचे उद्यान ठाण्यातच तयार केले तर त्याचे अनेक फायदे होणार असल्याचे यावेळी सदस्यांनी सांगितले. पर्यटनस्थळ म्हणूनही ते विकसित होऊ शकणार आहे. तसेच बॉटिनिकल क्षेत्रातील विद्यार्थ्यांना येथे प्रत्यक्षात अभ्यास करण्याची संधीदेखील उपलब्ध होणार आहे. त्यामुळे असे उद्यान विकसित करावे अशी मागणी भोसले यांनी केली. त्यानुसार याचा अभ्यास करून येत्या काळात त्यादृष्टीने काय करता येईल, हे निश्चित केले जाणार आहे. यासाठी घोडबंदर भागातील मुल्ला बाग येथील उद्यानाच्या एका पार्टमध्ये हे उद्यान विकसित करता येऊ शकते का, याचाही अभ्यास केला जाणार आहे.