गावपाड्यातील शुद्ध पाण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:43 AM2021-08-27T04:43:41+5:302021-08-27T04:43:41+5:30
ठाणे : सध्याच्या कोरोनाच्या कालावधीसह संभाव्य तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजनांसह जिल्ह्यातील ग्रामस्थांना स्वच्छ, शुद्ध ...
ठाणे : सध्याच्या कोरोनाच्या कालावधीसह संभाव्य तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजनांसह जिल्ह्यातील ग्रामस्थांना स्वच्छ, शुद्ध पिण्याचे पाणी मिळत आहे की नाही, त्यासाठी कोणकोणते उपक्रम हाती घेतले, आदींसाठी जल जीवन मिशनच्या कामांची झाडाझडती ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी गुरुवारी घेतली. सप्टेंबर ते मार्च या सहा महिन्यांच्या कामांचा कृती आराखडा तातडीने देऊन त्यानुसार कामे मार्गी लावण्याची तंबीही या आढावा बैठकीत दिली. यामुळे ठाणे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले.
''जिल्ह्यातील २३ गावपाड्यांमध्ये स्वातंत्र्यानंतरही ना रस्ता, ना वीज'' या मथळ्याखाली लोकमतने १५ ऑगस्टला वृत्त प्रसिद्ध करून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी या आढावा बैठकीत गावपाड्यांतील सध्याच्या सोयी-सुविधांसह पिण्याच्या पाण्याविषयी जिल्हा परिषद प्रशासनाला धारेवर धरले. यासाठी जल जीवन मिशन कामकाजाचा आढावा घेतला. जल जीवन मिशन हा केंद्र व राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. त्याद्वारे देण्यात आलेल्या उद्दिष्टपूर्तीसाठी तालुका यंत्रणेने प्रयत्न करणे आवश्यक आहे. कोरोनाची साथ, पावसाळा यामुळे उद्दिष्टपूर्तीसाठी विलंब न होता पुढील सहा महिन्यांचा आराखडा तातडीने जिल्हा परिषदेकडे सादर करावा. त्यानुसार कामे पूर्ण होतील, यासाठी अधिकचे लक्ष पुरवावे. जेणेकरून ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळू शकेल, असे जिल्हाधिकारी यांनी प्रशासनाला सुनावले.
यावेळी गावखेड्यांमधील नळजोडणी नसलेल्या अंगणवाडी केंद्र, शाळा, त्याचबरोबर गावांतील पाणी गुणवत्ता नमुना तपासणी, पाणी गुणवत्ता स्रोतांचा स्वच्छता सर्वेक्षण आढावा, घरगुती नळजोडणी, आदींवर यावेळी चर्चा झाली. या आढावा बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक दादाभाऊ गुंजाळ, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राधेश्याम आडे, यांच्यासह पाचही तालुक्यांचे गटविकास अधिकारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.
----------