सुशोभीकरणाच्या नावाखाली मीरा भाईंदर महापालिकेचा झाडेतोड कार्यक्रम सुरूच
By धीरज परब | Published: January 15, 2024 07:44 PM2024-01-15T19:44:21+5:302024-01-15T19:44:27+5:30
घोडबंदरच्या नैसर्गिक तलाव किनाऱ्याची जुनी झाडे सुशोभीकरणाच्या नावाखाली तोडण्याचा निर्णय
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेचा झाडे तोडण्याचा एककलमी कार्यक्रम मात्र सुरूच आहे . आता घोडबंदर येथील नैसर्गिक तलाव सभोवताली असलेल्या १६ मोठ्या व जुन्या झाडांची कत्तल सुशोभीकरणाच्या नावाखाली महापालिकेने चालवली आहे . त्या बाबत हरकती येऊन देखील सुनावणी मात्र पालिकेने घेतली नाही .
घोडबंदर गावा कडे जाणाऱ्या तसेच बस डेपो पासून काही अंतरावर जुना नैसर्गिक तलाव आहे . सदर तलाव नैसर्गिक असल्याने संरक्षित आहेतच शिवाय पाणथळ क्षेत्र आहे . ह्या तलावाच्या सभोवताली जुनी अनेक झाडे आहेत . सातबारा नोंदी हा तलाव म्हणून नमूद असून महापालिकेची मालमत्ता नाही . मध्यंतरी रस्ता रुंदीकरण आणि गटार बांधण्याच्या नावाखाली दर्शनी भागातील अनेक मोठी जुनी झाडे महापालिकेने कत्तल केली होती .
आता तलाव सुशोभीकरणच्या नावाखाली महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील उरल्या सुरल्या जुन्या व मोठ्या झाडांची कत्तल करण्याचा घाट घातला आहे . बांधकाम विभागाच्या प्रस्तावा नुसार वृक्ष प्राधिकरण विभागाने येथील सुमारे ५० ते ५५ फूट उंच २ वडाची जुनी मोठी झाडे , ३ उंबर , २ काटेरी चिंच , करंज आदी १६ झाडांची कत्तल करण्याची जाहिरात प्रसिद्ध केली होती . त्याला फॉर फ्युचर इंडिया ह्या संस्थेने विरोध करत हरकत नोंदवली . परंतु हरकत नोंदवून देखील त्यावर पालिकेने सुनावणीच घेतली नाही . उलट संस्थेचे अध्यक्ष हर्षद ढगे यांना पत्र देऊन तक्रार निकाली काढल्याचे कळवले .
महापालिकेच्या बांधकाम विभाग आणि वृक्ष प्राधिकरण विभागाच्या संगनमताने आता पर्यंत शहरातील काही हजार झाडांची कत्तल केली गेली असून जुन्या आणि मोठ्या झाडांचा प्रचंड प्रमाणात ऱ्हास केला गेला आहे . नैसर्गिक तलाव असताना मोठी झाडे तशीच ठेऊन सुशोभीकरण करण्या ऐवजी ठेके काढून ठेकेदारासह संबंधितांचा आर्थिक फायदा करून देण्यासाठी झाडांवर संक्रांत आणली जात असल्याचा आरोप हर्षद ढगे यांनी केला आहे . या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर व फौजदारी कारवाईची मागणी त्यांनी केली आहे .