आगीपासूनच्या संरक्षणासाठी शहर विकास विभागाची झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 12:34 AM2020-02-29T00:34:10+5:302020-02-29T00:34:13+5:30
भाजपच्या तक्रारीनंतर आली जाग; रात्रपाळीतही सुरक्षारक्षक तैनात
ठाणे : ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागावर अनेक गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे आगीचे सावट असल्याची भीती भाजपाचे गटनेते नारायण पवार यांनी व्यक्त केल्यानंतर आता प्रशासनाने या विभागात आगप्रतिबंधक उपाययोजना आहेत की नाही, याबाबत तपासणी करून झाडाझडती सुरू केली.
पवार यांनी बुधवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना पत्र दिल्यानंतर प्रशासनाने शुक्रवारपासून शहर विकास विभागाची सुरक्षा वाढवून विभागातील इलेक्ट्रिकल वायरिंगची तपासणी सुरू केली आहे. तसेच अग्निशमन विभागानेही पाहणी केली आहे.
शहर विकास विभागात गेल्या काही वर्षांपासून हजारो इमारतींचे सीसी, पार्ट ओसी, ओसीसह टीडीआर दिल्याची अनेक कागदपत्रे आहेत. त्यातील काही वादग्रस्त प्रस्तावांच्या अनेक तक्रारीही सरकारदरबारी दाखल आहेत. तर, काहींची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे चौकशीही सुरू आहे. काही व्यवहारांसंदर्भात उच्च न्यायालयाकडे जनहित याचिकाही (पीआयएल) दाखल असून या सर्व ‘स्फोटक’फायलींच्या साठ्यास स्वत:च्या बचावासाठी संबंधितांकडून आग लावण्याची भीती वाटत असल्याची तक्रार त्यांची होती. त्यानंतर प्रशासनाने झाडाझडती घेण्यास सुरूवात केली आहे.
सर्व विभागांची तपासणी करा
मनसेचे विभागअध्यक्ष महेश कदम यांनी केवळ शहर विकास नव्हे तर महापालिकेच्या सर्व विभागांचे फायर आॅडिट करण्याची मागणी आयुक्तांना पत्र लिहून केली आहे.
अशी घेण्यात येत आहे दक्षता
पवार यांच्या तक्रारीनंतर उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी सुरक्षा विभाग, अग्निशमन विभाग आणि विद्युत विभागाला तातडीचे पत्र पाठवून या विभागाची योग्य ती दक्षता घ्यावी, अशी सूचना केली आहे.
त्यानुसार, दिवसभर तर या विभागात सुरक्षारक्षकांची गस्त असतेच, आता मात्र रात्रपाळीही सुरूकरून त्यासाठी दोन सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. तसेच अग्निशमन उपकरणे कार्यरत आहेत किंवा कसे, याच्या तपासणीचे कामही सुरू झाले आहे.
विद्युत विभागाकडूनही या विभागातील वायरिंग सुस्थित आहे की नाही, की कुठे शॉर्टसर्किटची भीती आहे, याची तपासणी सुरू असल्याची माहिती बुरपुल्ले यांनी दिली.