ट्री गणेशाला परदेशातही मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 12:56 AM2017-07-27T00:56:52+5:302017-07-27T00:56:54+5:30
पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण करणे ही प्राथमिक जबाबदारी असून, याचे भान ठेवून पर्यावरणस्नेही उत्सव साजरा करण्याचा कल वाढत आहे
- प्राची सोनवणे
पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण करणे ही प्राथमिक जबाबदारी असून, याचे भान ठेवून पर्यावरणस्नेही उत्सव साजरा करण्याचा कल वाढत आहे. सण, उत्सवांमधून पर्यावरणाचा वाढता ºहास, प्रदूषणाची समस्या आदी गोष्टींना आळा घालण्यासाठी विविध संकल्पना राबविल्या जात असून, इको फे्रंडली गणेशोत्सव ही संकल्पना घरगुती मंडळांबरोबरच सार्वजनिक मंडळांमध्येही वापरली जात आहे.
सण-उत्सव साजरा करताना आपल्या सभोवतालच्या निसर्गाला कसल्याही प्रकारची हानी न होता तितक्याच थाटामाटात उत्सव साजरा होऊ शकतो हे पटवून देण्यासाठी मुंबईतील तरुणांनी पुढाकार घेतला आहे. मुंबईतील तरुणांकडून राबविल्या जाणाºया ‘ट्री गणेश’ या उपक्र माला अवघ्या दोन वर्षांतच चांगली पसंती मिळत आहे. ट्री गणेश या संकल्पनेनुसार लाल मातीपासून गणेशमूर्ती तयार केल्या जात असून, या मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर यामध्ये पेरलेल्या बियांपासून रोपटे तयार होते. मुंबईतील गणेशोत्सव पाहण्यासाठी दूरदूरहून भाविकांची गर्दी होते. जुहू चौपाटीला बाप्पाचे विसर्जन पाहण्यासाठी गेलेल्या तरुणांनी याठिकाणी काही गणेशमूर्तींचे भाग, अवशेष पाहिले आणि त्यांनी ट्री गणेश ही संकल्पना समोर आणली आहे. परेल येथे राहणाºया दत्ताद्री कोठूर याने स्वत: गणेशमूर्तीचा साचा तयार करून त्याद्वारे मातीचा बाप्पा साकारला. मातीच्या कुंडीसोबत असलेल्या या बाप्पाच्या मूर्तीमध्ये तसेच कुंडीत बिया पेरल्या जात असल्याने विसर्जनानंतर दहा दिवसांतच बिया रुजून या कुंडीत रोपटे उगवते. दत्ताद्री कोठूर याने ‘लोकमत’शी बोलताना यामध्ये कसलाही व्यवसाय करायचा हेतू नसून निसर्ग ही खरी संपत्ती आहे आणि तिचे जतन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य एवढाच संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवायचा आहे. यंदा ७५० मूर्तींचे बुकिंग झाले असून २० हून अधिक मूर्ती परदेशातही पाठविण्यात आल्या आहे.
वेळ आणि जागा नसल्याने आॅफिसमधून घरी आल्यावर मित्रांसोबत घरातील गच्चीवर बसून या मूर्ती त्यांनी तयार केल्या आहेत. या मूर्तींची किंमत २२०० ते ४५०० इतकी आहे. मूर्ती बनविण्यासाठी सध्या १५ तरुणांची टीम कार्यरत असून आपला व्यवसाय, नोकरी सांभाळून मूर्ती तयार करण्याचे काम केले जात आहे.
या मातीमध्ये शेणखत मिसळले जात असून यामध्ये भाज्यांच्या बिया पेरल्या जातात. कोठूर यांनी सुरु वातीला भेंडीच्या बिया पेरून या
उपक्र माला सुरु वात केली आणि प्रयोग चांगला यशस्वी ठरला. आर्ट डायरेक्टर म्हणून एका नामवंत कंपनीत काम करणाºया कोठूर यांनी गेल्या वर्षी मातीपासून बाप्पाच्या ५०० मूर्ती तयार केल्या होत्या आणि यावेळी १००० मूर्ती केल्या आहेत. ही मूर्ती कशी बनवावी याचा व्हिडीओ २० हजारांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचला असून परदेशातूनही या मूर्तीला मागणी असल्याचे कोठूर यांनी सांगितले. सोशल मीडियावर या संकल्पनेला भरभरु न प्रतिसाद मिळत असून या संकल्पनेचे स्वागत केले जात आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कौतुक
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही मूर्ती तयार करणे ते विसर्जनापर्यंतचा प्रवास असलेल्या व्हिडीओचा प्रचार व प्रसार करण्यास हातभार लावला आहे. विसर्जनाच्या वेळी अक्षरश: पायदळी येणाºया मूर्ती पाहून हा उपक्र म राबविला जात आहे.
कशी आहे संकल्पना? साच्याचा वापर करून किंवा हाताने लाल मातीपासून बाप्पाची मूर्ती तयार केली जाते. या मूर्तीमध्ये भाज्यांच्या बिया पेरल्या जातात. ही मूर्ती मातीच्या कुंडीत ठेवली जात असून या कुंडीतही उरलेली माती आणि बिया टाकल्या जातात.
विसर्जन करताना झाडाला पाणी घालतो त्याप्रमाणे या मूर्तीला पाणी घालावे. पाणी घातल्यानंतर ही मूर्ती मातीत मिसळते. काहीच दिवसांत या कुंडीतील बियांना अंकुर फुटून नवीन रोपटे उगवते.