वृक्ष लागवडीची चळवळ हरित क्रांती घडवेल - मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 12:43 AM2018-07-02T00:43:17+5:302018-07-02T00:43:29+5:30

भारताच्या इतिहासातील नवीन विक्रम करणारा आजचा दिवस आहे. वृक्षलागवडीचा कार्यक्रम आता केवळ सरकारचा राहिलेला नसून तो लोकचळवळीचा भाग बनला आहे.

Tree plantation movement will create green revolution - Chief Minister Fadnavis believes | वृक्ष लागवडीची चळवळ हरित क्रांती घडवेल - मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास

वृक्ष लागवडीची चळवळ हरित क्रांती घडवेल - मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास

Next

कल्याण : भारताच्या इतिहासातील नवीन विक्रम करणारा आजचा दिवस आहे. वृक्षलागवडीचा कार्यक्रम आता केवळ सरकारचा राहिलेला नसून तो लोकचळवळीचा भाग बनला आहे. भावी पिढीसमोर जल, जंगल, जमीन वाचवण्याचे आव्हान उभे ठाकले असताना वृक्षलागवडीची लोकचळवळ महाराष्ट्रात हरित क्रांती घडवेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
१३ कोटी वृक्षारोपण महामोहिमेच्या राज्यस्तरीय शुभारंभाचा कार्यक्रम रविवारी कल्याणजवळील वरप येथील राधास्वामी सत्संग आश्रमामागील वनविभागाच्या जागेवर पार पडला. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री एकनाथ शिंदे, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, वनराज्यमंत्री राजे अंबरिश आत्राम, सपना मुनगंटीवार, खासदार कपिल पाटील, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार संजय केळकर, नरेंद्र पवार, निरंजन डावखरे, ज्योती कलानी, जि. प. अध्यक्ष मंजूषा जाधव, सद्गुरू जग्गी वासुदेव, सिनेदिग्दर्शक सुभाष घई, आचार्य बाळकृष्ण, मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, राज्यात ५० कोटी वृक्षलागवडीचा संकल्पना २०१६ मध्ये मांडण्यात आली. सुरुवातीला इतरांना हे दिवास्वप्न वाटत होते. २०१६ ला तीन कोटी वृक्षांची लागवड करण्यात आली. गेल्या वर्षी पाच कोटींपेक्षा अधिक वृक्ष लागले. यंदा १३ कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प केला आहे; पण त्याहून अधिक वृक्षांची लागवड केली जाईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
वृक्षलागवडीची संकल्पना आता सरकारी राहिलेली नाही, तर ती लोकचळवळ बनली आहे आणि जेव्हा जनतेचे आंदोलन सुरू होते, तेव्हा त्याला कोणीही थांबवू शकत नाही. या चळवळीतूनच हरित महाराष्ट्राचे पाहिलेले स्वप्न पूर्ण होणार असल्याचे फडणवीस म्हणाले. केवळ वृक्ष लावून आपण थांबणार नाहीत. दुसऱ्या टप्प्यात जिओ टॅनिंग करण्यात येणार असून प्रामाणिकपणे प्रत्येक रोपाच्या वाढीची नोंद होणार आहे. आता वाढदिवशी आणि मंगलप्रसंगी रोपे लावण्याची प्रथा जनतेमध्ये रुजत आहे, ही चांगल्या बदलाची सुरुवात आहे, असेही फडणवीस म्हणाले.

नागरिकच होणार आॅडिटर
नुसते खड्डे केले आणि झाडे लावली, असे आता होणार नाही. तुम्ही प्रत्यक्ष व्हिडीओ क्लिप्सद्वारे प्रत्येक कालावधीतील रोपांची वाढ पाहू शकता. एक प्रकारे नागरिकच या मोहिमेचे आॅडिटर असतील, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांतील प्रयत्नांमुळे महाराष्ट्र देशात वनसंपदा वाढवण्यात अग्रेसर ठरत असून २७३ स्कवेअर किलोमीटर वनक्षेत्र वाढले आहे. ५० टक्के मॅन्ग्रोव्हची वाढ झाली असून चार हजार ४६५ स्क्वेअर किमी बांबू क्षेत्र वाढत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

मुनगंटीवार यांचे कौतुक
आजपर्यंतच्या सर्व वनमंत्र्यांमध्ये सुधीरभाऊ यांना पहिला क्रमांक दिला पाहिजे. लावलेली झाडे मोठी होताना पाहणे, हे मुनगंटीवार यांच्यासाठी मोठे समाधान असेल, अशा शब्दांत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले. सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी आपल्या भाषणात मुनगंटीवार यांचा उल्लेख ग्रीन वॉरिअर असा केला. यावेळी सुभाष घई आणि आचार्य बाळकृष्ण यांनीदेखील मनोगत व्यक्त केले.

Web Title: Tree plantation movement will create green revolution - Chief Minister Fadnavis believes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.