सूर्याच्या कालव्यांत झाडाझुडुपांचे साम्राज्य
By admin | Published: October 28, 2015 11:12 PM2015-10-28T23:12:21+5:302015-10-28T23:12:21+5:30
सूर्या धरणाच्या कालव्यात पावसाळी झाडेझुडुपे वाढल्याने प्रवाहास होत असलेली अडचण लक्षात घेऊन खात्याने ही झुडुपे तोडण्याची गरज आहे
डहाणू : सूर्या धरणाच्या कालव्यात पावसाळी झाडेझुडुपे वाढल्याने प्रवाहास होत असलेली अडचण लक्षात घेऊन खात्याने ही झुडुपे तोडण्याची गरज आहे. दरवर्षी या कालव्याच्या दुरुस्तीसाठी लाखोंचा खर्च होतो. त्यांची अवस्था सुधारावी, ही शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी असून त्यांची दखल खात्याने कधीच घेतली नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. त्यामुळे त्यातील मोठमोठाले खड्डे आजही दुरुस्त झालेले नाहीत. परिणामी, अनेक भागांत हे कालवे उखडले गेले आहेत. त्यामुळे त्यांना गळती लागून शेतकरी पाण्यापासून वंचित आहेत. पाटबंधारे खात्याने त्यांच्या देखभालीकडे लक्ष देऊन त्यांची दुरवस्था थांबवण्याची मागणी शेतकरी करत आहेत. काही दिवसांपासून या त्यांना सतत कोठे ना कोठे भगदाड पडत आहे. त्यातील अपुऱ्या पाण्यामुळे येथील शेतकऱ्यांवर दुबार पिके घेण्याच्या संधीला मुकण्याची वेळ आली आहे. यामुळे येथील भातशेती धोक्यात आली आहे. याशिवाय, त्यात ठिकठिकाणी गाळही साठला आहे. (वार्ताहर)
सूर्या प्रकल्पातील कवडास आणि धामणी धरणांचे पाणी शेतीला पुरवण्यासाठी ३० वर्षांपूर्वी डावा आणि उजवा तीर कालवे बांधण्यात आले आहेत.
त्यांचे निकृष्ट बांधकाम आणि त्यांच्या देखभाल तसेच दुरुस्तीकडे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेले दुर्लक्ष यामुळे कालव्यांना गळती लागून त्यातून लाखो लीटर पाणी वाया जात आहे.
याचे प्रमाण वाढल्याने आणि अनेक ठिकाणी मोठी भगदाडे पडल्याने येथील शेतीला पुरेसा पाणीपुरवठा होत नाही.