कल्याण-डोंबिवलीत झाडांची पडझड सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:43 AM2021-05-21T04:43:07+5:302021-05-21T04:43:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : तौक्ते चक्रीवादळामुळे कल्याण-डोंबिवलीत आतापर्यंत ३०० च्या आसपास झाडांची पडझड झाली आहे. अजूनही पडझड सुरूच ...

Trees continue to fall in Kalyan-Dombivali | कल्याण-डोंबिवलीत झाडांची पडझड सुरूच

कल्याण-डोंबिवलीत झाडांची पडझड सुरूच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : तौक्ते चक्रीवादळामुळे कल्याण-डोंबिवलीत आतापर्यंत ३०० च्या आसपास झाडांची पडझड झाली आहे. अजूनही पडझड सुरूच असल्याचे दूरध्वनी अग्निशमन दलाच्या कार्यालयांमध्ये खणखणत आहेत. पडलेल्या झाडांपैकी २६२ झाडे तोडण्यात आली आहेत. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळामुळे अग्निशमन दलाच्या जवानांची पुरती दमछाक होत आहे. मोठ्या प्रमाणावर झाडे पडल्याने अखेर कंत्राटदाराच्या कामगारांचा आधार घ्यावा लागला आहे.

तौक्ते चक्रीवादळाच्या आधी शनिवारी रात्री उशिरा जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला. १० ते १५ मिनिटेच पाऊस पडला; पण वादळी वाऱ्यात तेव्हाही महापालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात झाडे कोसळली होती. कल्याण पश्चिमेत एका घराचे नुकसान झाले, तर तेथेच विजेच्या तारांवर झाडाच्या फांद्या पडल्याने ट्रान्स्फाॅर्मरला आग लागल्याची घटनाही घडली. झाड पडल्याने काही ठिकाणांचे रस्तेही बंद झाल्याचे कल्याण-डोंबिवलीत पाहायला मिळाले. सायट्यांची पार्किंग शेड, लोखंडी गेटचेही नुकसान झाले. कोसळलेल्या झाडांच्या फांद्या तोडून ती झाडे बाजूला करून वाहतूक आणि जनजीवन सुरळीत करण्याचे प्रयत्न महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून रविवारी सुरू असतानाच, सोमवार (दि. १७)च्या ‘तौक्ते’नेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले.

झाडे कोसळण्याबरोबरच घरांवरील, सोसायट्यांच्या गच्च्यांवरील सिमेंट आणि पत्र्याची शेड‌्स वाऱ्याबरोबर उडून इतरत्र जाऊन पडली. महामार्गावरील होर्डिंग्ज कोसळून काहीजण जखमीही झाले. वीजपुरवठाही बहुतांश ठिकाणी खंडित झाला होता.

दरम्यान, झाडे पडण्याच्या घटना आजही सुरूच आहेत. दर १० मिनिटांनी अग्निशमन विभागाच्या कार्यालयात फोन येत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. पडलेली झाडे हटविण्याचे काम अग्निशमन दलाकडून सलग पाचव्या दिवशीही सुरू होते.

अग्निशमन दलातील काही कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याने ते सुटीवर आहेत. काहीजण घरातील विवाह सोहळ्यानिमित्त सुटीवर आहेत. आधीच पुरेशा मनुष्यबळाची कमतरता असताना, सध्या उपलब्ध अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच दिवस-रात्र राबून पडलेली झाडे हटवावी लागत आहेत. यात काही कर्मचारी तर गेले चार ते पाच दिवस घरीही गेलेले नाहीत. येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.

--------------

केडीएमसीच्या अग्निशमन दलात मागील वर्षी २८ जण दाखल झाले आहेत. त्यामुळे मनुष्यबळ पुरेसे आहे. आपत्कालीन परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर झाडे पडल्याने आपण कंत्राटदाराच्या २० कामगारांची मदत घेतली आहे.

- नामदेव चौधरी, अधिकारी, अग्निशमन दल, केडीएमसी

-----------------------------

Web Title: Trees continue to fall in Kalyan-Dombivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.