मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीत झाडांची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 01:58 AM2020-07-06T01:58:13+5:302020-07-06T01:58:20+5:30
लॉकडाऊनमुळे या संततधार पावसाचा दैनंदिन जीवनावर परिणाम जाणवला नसली तरी रविवारी दिवसभरात १३ ठिकाणी झाडे पडली. यामध्ये मालमत्तेचे किरकोळ नुकसान वगळता कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
कल्याण : सलग तिसऱ्या दिवशी कल्याण-डोंबिवलीत पावसाची संततधार पाहावयास मिळाली. अधूनमधून पावसाचा जोर कमी होत असल्याने साचलेले पाणी ओसरण्यास मदत झाली. लॉकडाऊनमुळे या संततधार पावसाचा दैनंदिन जीवनावर परिणाम जाणवला नसली तरी रविवारी दिवसभरात १३ ठिकाणी झाडे पडली. यामध्ये मालमत्तेचे किरकोळ नुकसान वगळता कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
कल्याण-डोंबिवलीत शुक्रवारपासूनच संततधार पाऊस पडत आहे. दोन दिवस राहिलेला पावसाचा जोर रविवारी फारसा दिसून आला नाही. रात्रीच्या विश्रांतीनंतर पावसाने सकाळी पुन्हा सुरुवात केली. त्यामुळे काही सखल भागांत पाणी साचले होते. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला. रविवारी कल्याण-डोंबिवलीत १३ ठिकाणी झाडे पडली. कल्याणमधील मुरबाड रोड, वालधुनी उड्डाणपूल, हाजीमलंग रोड, चक्कीनाका, पत्रीपूल उर्दू शाळा तर डोंबिवलीतील पांडुरंग शाळेजवळ, आयरेगाव, म्हात्रेनगर, नवापाडा, गरिबाचा वाडा, बालभवन, एमआयडीसी निवासी परिसरात झाडे कोसळल्याची माहिती अग्निशमन विभागाचे अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली. गरिबाचा वाडा येथे झाड पडल्याने मालमत्तेचे झालेले किरकोळ नुकसान वगळता अन्य कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
पाणी तुंबल्याच्या तक्रारी आलेल्या नसल्याचेही ते म्हणाले. कल्याण ग्रामीण भागात दोन दिवसांपासून कोसळणाºया पावसामुळे येथील वडवली नदी आणि देसाई खाडी तुडुंब भरून वाहू लागली आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर आजूबाजूच्या गावात तसेच तेथील गृहसंकुलांमध्ये पाणी शिरण्याची दाट शक्यता आहे.
संरक्षक भिंत कोसळली
संततधार पडणाºया पावसामुळे डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरातील ज्येष्ठ नागरिक सभागृहाची एका बाजूची संरक्षक भिंत कोसळल्याची घटना रविवारी घडली. एम्स रुग्णालय रोड, मॉडेल कॉलेज, मिलापनगर तलाव रोडवर पावसाचे पाणी साचले होते. नवीन गटार बांधणीची कामे अर्धवट राहिल्याने तसेच नालेसफाई योग्य प्रकारे न झाल्याने पाणी साचल्याचा आरोप स्थानिकांनी केला. त्याचबरोबर खाजगी केबल कंपन्यांनीही खोदलेले रस्ते सुस्थितीत न केल्याने काही ठिकाणी चिखलमय परिस्थिती निर्माण झाली होती.