ब्राम्हणपाड्यात वादळी पावसाने झाडे कोसळली, दिवाळीचे साहित्य भिजले
By सदानंद नाईक | Published: November 10, 2023 05:48 PM2023-11-10T17:48:49+5:302023-11-10T18:01:47+5:30
उल्हासनगरात गुरवारी सायंकाळी अचानक जोराचे वारे वाहून पावसाला सुरुवात झाली.
उल्हासनगर : वादळीवाऱ्यासह गुरवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावल्याने, ४ ठिकाणी जुने झाडे व हिराघाट येथील महावितरण कार्यालयाचे शेड कोसळल्याची घटना घडली. तर कॅम्प नं-४ येथील ब्राम्हणपाडा येथे नाली तुंबून घरात पाणी घुसल्याने, नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
उल्हासनगरात गुरवारी सायंकाळी अचानक जोराचे वारे वाहून पावसाला सुरुवात झाली. दिवाळीसाठी खरेदी करण्यासाठी आलेल्या हजारो नागरिकांची यामुळे परवड झाली. अचानक आलेल्या पावसाने दुकांना समोर ठेवलेले साहित्य, हातगाडीधारक व आदिवासी बांधवानी विक्रीसाठी आणलेले साहित्य पावसाने भिजल्याचे चित्र मार्केट मध्ये होते. कॅम्प नं-४, मोर्यांनगरी येथे जुने झाड पडल्याने, परिसराचा वीज पुरवठा खंडित झाला. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कॅम्प नं-३ येथील साईबाबा एमएसईबी कार्यालय व ओटी सेक्शन ठिकाणी झाडे कोसळून वाहतूक कोंडी झाली. कॅम्प नं-२, रमाबाई आंबेडकरनगर येथेही जुने झाड कोसळले असून हिराघाट येथील महावितरण कार्यालयाचे शेड पडल्याची माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख बाळू नेटके यांनी दिली.
महापालिकेने कॅम्प नं-५, दसरा मैदानात भरविलेल्या दिवाळी बाजारालाही वादळी जोरदार वारा व पावसाचा फटका बसला. बहुसंख्य दुकानदारांनी पावसाच्या भीतीने आदीच साहित्य वाहनाने घरी नेल्याने, कमी साहित्य पावसात भिजले. ऐन दिवाळीत वादळी पावसाने शहरातील नाले खळखळून वाहून अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना घडल्या आहेत. शहरातील मार्केट मध्ये बदलापूर, नेरळ, कर्जत, शहापूर, मुरबाड व कसारा गाव भागातून विकण्यासाठी आलेल्या आदिवासी बांधवाचे साहित्य भिजल्याने, त्यांना रिकाम्या हाती घरी परतावे लागले. शुक्रवारी पुन्हा वादळी वारे व पाऊस सुरू झाल्याने मार्केट मध्ये खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची धावपळ उडाली आहे.