ठाण्यात तीन ठिकाणी पार्क केलेल्या वाहनांवरती झाडे कोसळली; नऊ वाहनांचे नुकसान
By अजित मांडके | Published: July 19, 2023 10:42 AM2023-07-19T10:42:29+5:302023-07-19T10:45:37+5:30
सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसून पांचपाखाडी येथील घटनेत सोसायटीची सुमारे १५ फुटाची सुरक्षा भिंत पडली आहे.
ठाणे : सातत्याने संततधार सुरू असलेल्या पाऊसाबरोबर बुधवारी पहाटेच्या सुमारास जोराचा वारा सुटला होता. याचदरम्यान पहाटे साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास वेगवेगळ्या तीन ठिकाणी तेथे पार्क केलेल्या वाहनांवरती झाडे कोसळली आहेत. दोन घटना या पोखरण रोड नंबर २ या परिसरात तर एक घटना पांचपाखाडी, संत ज्ञानेश्वर मार्ग आणि आणखी एक घटना लोकमान्य बस डेपो परिसरात घडली, या घटनांमध्ये एकूण नऊ वाहनांचे नुकसान झाले आहे. यामध्ये चार दुचाकींसह ४ चारचाकी आणि एक रिक्षा या वाहनांचा समावेश आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसून पांचपाखाडी येथील घटनेत सोसायटीची सुमारे १५ फुटाची सुरक्षा भिंत पडली आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यातच हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जाहीर केले आहे. त्यातच बुधवारी पहाटे पावसासह जोराचा वारा सुटला होता. याचदरम्यान पांचपाखाडी संत ज्ञानेश्वर मार्ग येथील दांडेकर दत्त छाया सोसायटीच्या आवारा मधील झाड पार्क केलेल्या दोन दुचाकी व एका ऑटो रिक्षा वाहनांनवरती झाड पडल्याने दोन दुचाकी आणि एका रिक्षाचे किरकोळ नुकसान झाले आहे.तसेच त्या सोसायटीची १५ फूट भिंत पडली आहे. ही घटना बुधवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. तर, दुसरी घटना पोखरण रोड नंबर २ परिसरातील कोकणीपाडा, गावंडबाग, या ठिकाणी रस्त्यावरती पार्क केलेल्या दोन दुचाकीवर झाड पडले. त्या दोन्ही वाहनाचे किरकोळ नुकसान झाले आहे. तसेच तिसरी घटना पोखरण रोड नंबर २ येथील मारुती मंदिर या ठिकाणी रस्त्यावरती पार्क केलेल्या दोन चार चाकी (बस) वाहनांवरती झाड पडले होते.
यामध्ये एका वाहनाच्या पुढील बाजूचे नुकसान झाले आहे. तर दुसऱ्या वाहनाच्या छताचे नुकसान झाले आहे. या दोन्ही घटना या साधारणपणे पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडल्या आहेत. लोकमान्य बस डेपोच्या पुढे पार्क केलेल्या दोन चारचाकी वाहनावरती सकाळी सात वाजण्याच्या सुमारास झाड पडले. यामध्ये दोन चारचाकी वाहनांचे नुकसान झाले असून या चार ही घटनांची माहिती मिळताच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल या विभागांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच वाहनांवर आणि रस्त्यावरती पडलेली ती झाडे तातडीने कापून एका बाजूला करण्यात आली अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.