झाडे कापली, पाणवठे बुजवले! समृद्धी महामार्गाच्या ठेकेदाराकडून नियमबाह्य काम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 12:55 AM2020-01-14T00:55:41+5:302020-01-14T06:26:12+5:30

सुरुंगस्फोटामुळे घरांना तडे

The trees were cut off, the water was extinguished! Out-of-bounds work by the Prosperity Highway contractor | झाडे कापली, पाणवठे बुजवले! समृद्धी महामार्गाच्या ठेकेदाराकडून नियमबाह्य काम

झाडे कापली, पाणवठे बुजवले! समृद्धी महामार्गाच्या ठेकेदाराकडून नियमबाह्य काम

Next

श्याम धुमाळ 

कसारा : राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, या कामादरम्यान ठेकेदारांकडून सरकारी नियम, अटी-शर्ती सर्रास धाब्यावर बसवल्या जात आहेत. ओपन ब्लास्टिंगसह साग, खैर, निलगिरी, पळस यासारख्या वृक्षांची कत्तल करून वाहतुकीसाठी बेकायदा रस्ते तयार केले आहेत. यामध्ये ठेकेदार, पोटठेकेदार शहापूर तालुक्यातील जलस्रोत मातीचा भराव करून बुजवत आहेत. पाणीटंचाईच्या काळात आधार असलेले हे पाणीसाठेच गायब झाल्याने उन्हाळ्यात येथील गावपाड्यांना तीव्र पाणीटंचाई भेडसावणार आहे.

शहापूर तालुक्यातून ५० किलोमीटर समृद्धी मार्ग जात आहे. तालुक्यातील गोलभन, आंब्याचापाडा, कसारा (धोबीपाडा), राईचीवाडी, फुगाळा अशा विविध ठिकाणी कामे सुरू आहेत. या महामार्गाचे अधिकृत कंत्राट नवयोगा आणि अपकॉन या आंध्र प्रदेशमधील कंपनीला देण्यात आले आहे. या ठेकेदार कंपनीने बोगदा आणि ब्लास्टिंगचे काम एका पोटठेकेदाराला दिले आहे. ओपन ब्लास्टिंगमुळे अनेकांच्या घरांना तडेही गेले आहेत, तर अनेक गावांतील विहिरीतील पाण्याचे स्रोत कमी झाले आहेत. कंट्रोल ब्लास्टची परवानगी असताना कंपनी ज्वलनशील स्फोटके वापरून ब्लास्टिंग करत आहे. सार्वजनिक ठिकाणी दोन ट्रक स्फोटके घेऊन उभे असतात. ब्लास्टिंगमुळे धोबीपाडा येथील घरांना तडे गेले आहेत. मात्र, आजपर्यंत कोणतीही मदत त्यांना देण्यात आलेली नाही.

२०० मीटरवर असलेल्या नॅशनल हायवे क्रमांक ३ वरही याचा परिणाम होत आहे. या ठिकाणी चरण्यासाठी येणाऱ्या गुरेही ब्लास्टिंगमुळे भयभीत होत आहेत. संबंधित ठेकेदार हे स्वत:च्या फायद्यासाठी बेकायदा अंतर्गत रस्ते तयार करत आहेत. शेकडो झाडे तोडण्याबरोबरच नैसर्गिक नाले, पाझर तलाव मातीदगडांचा भराव टाकून हे जलस्रोत उघडपणे बुजवले जात आहेत. त्यामुळे वन्यजीवांचे पाणवठेच गायब होत असल्याने त्यांची पाण्यावाचून तडफड होत आहे. तसेच पाणीटंचाईच्या काळात लगतच्या गावपाड्यांचा आधार असलेले हे जलस्रोत बुजवल्याने ग्रामस्थांना वणवण करावी लागणार आहे. तसेच फुगाळा येथील गावकीच्या तलावावरही अतिक्रमण करून त्याचे पाणी कामासाठी वापरले जात आहे. याविरोधात कोणी बोलल्यास भाडोत्री गुंडांमार्फत दमदाटी केली जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याबाबत ग्रामस्थांनी तक्र ारी करूनही संबंधित यंत्रणेने त्यांना केराची टोपली दाखवली आहे.

आदिवासींनी एखादे झाड तोडले तरी त्यावर कारवाईचा बडगा उभारण्यात येतो. मात्र, शहापूर तालुक्यात नियमबाह्य व शासन नियम डावलून अनेक वृक्षांची कत्तल करून कंपनीने रस्ते तयार करून वनसंपदा नष्ट केली आहे. याबाबत शहापूर, खर्डी, कसारा, वाशाला वनविभागातील अधिकारी झोपेचे सोंग घेतले आहे. समृद्धीच्या ठेकेदार कंपनीवर महसूल आणि वनविभाग यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने या नियमबाह्य कामावर समृद्ध शासकीय यंत्रणेची कृपादृष्टी असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी विहिगाव वनाधिकारी प्रियंका उबाळे आणि शहापूरचे तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.

कसारा-वाशाला रस्ता बनला धोकादायक
अ‍ॅपकॉन कंपनीची मोठमोठी यंत्रसामग्री कसारा-वाशाला मार्गावरून जात असल्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे दररोज अपघात होत असून काही दिवसांपूर्वी एसटी बसलाही अपघात झाला होता. या रस्त्याच्या दुरु स्तीसाठी वाशाला, ढाकणेसह १२ गावपाड्यांतील नागरिकांनी दोषी कंपनीला जाब विचारला होता. तेव्हा हा रस्ता दुरु स्त करून देण्याची ग्वाही अ‍ॅपकॉन कंपनी प्रशासनाने दिली होती. दोन महिने उलटूनही दुरु स्ती न झाल्यामुळे रस्ता ‘जैसे थे’ आहे.

Web Title: The trees were cut off, the water was extinguished! Out-of-bounds work by the Prosperity Highway contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.