संततधार पावसाने उडाली त्रेधातिरपीट!
By admin | Published: June 28, 2017 03:13 AM2017-06-28T03:13:33+5:302017-06-28T03:13:33+5:30
कल्याण-डोंबिवली परिसरात सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाची मंगळवारीही संततधार कायम होती. यामुळे कल्याण-डोंबिवलीतील सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण-डोंबिवली परिसरात सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाची मंगळवारीही संततधार कायम होती. यामुळे कल्याण-डोंबिवलीतील सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबले. अनेक ठिकाणी झाडेही उन्मळून पडली. कल्याणच्या शिवाजी चौकात रस्ता खचून भगदाड पडल्याने तेथे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला.
कल्याण-डोंबिवली परिसरात आतापर्यंत ४२९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. डोंबिवलीत रेल्वेस्थानक परिसर, मार्केट, पश्चिमेतील कोपर रोड, जुनी डोंबिवली, फुले रोड, तसेच पूर्वेतील रामनगर, गोग्रासवाडी, तुकाराम नगर, मानपाडा रोड, औद्योगिक निवासी विभाग, नांदिवली-भोपर, कल्याण-शीळ रोड, पश्चिमेतील गोपीनाथ चौक, केळकर रोड आदी ठिकाणी मंगळवारी माठ्या प्रमाणात पाणी साचले होते.
कल्याणमध्ये शिवाजी चौक, महमद अली चौक, जोशी बाग,
कुं भारवाडा आदी परिसर जलमय झाले होते. महमद अली चौक परिसरातील दुकानांमध्ये गटाराचे सांडपाणी शिरले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
शिवाजी चौकात रस्ता खचल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. मात्र, त्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही. या चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले पाणी आणि खचलेल्या रस्ता यामुळे तासभर वाहतूककोंडी झाली होती.
बल्याणी येथील
घरे पाण्याखाली
लोकमत न्यूज नेटवर्क
टिटवाळा : पावसाच्या संततधारेमुळे केडीएमसीतील प्रभाग क्र मांक ११ बल्याणी येथील मोहिली रस्त्यावरील चाळींमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. यामुळे चाळीतील रहिवाशांचे हाल झाले आहेत. याप्रश्नाकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन कानाडोळा करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
पावसाने तीन-चार दिवसांपासून हजेरी लावल्याने मोहिली रस्त्यावरील चाळींमध्ये तीन ते चार फूट पाणी शिरले आहे. त्यामुळे तेथील अनेक कुटुंबे पाण्याखाली आहेत. घरात पाण्याबरोबर गाळ आल्याने त्यांचे अतोनात हाल झाले आहेत. केडीएमसीतील एका सफाई कामगाराने केलेल्या चाळीच्या बांधकामामुळे नाला बुजल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. दरम्यान, या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचलेली नाही.
बल्याणी परिसरात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम वस्ती आहे. सोमवारी ईदच्या दिवशी तेथील रहिवाशांना पूरसदृश्य परिस्थितीचा सामना करावा लागला. तीन दिवसांपासून येथील पुरुष नोकरी-व्यवसायासाठी घराबाहेर पडले नाहीत.