आदिवासींची तहान भागवण्यासाठी तलाव खणला
By Admin | Updated: June 4, 2016 01:32 IST2016-06-04T01:32:52+5:302016-06-04T01:32:52+5:30
आदिवासी भागातील तलावात गेल्या काही वर्षांपासून आसपासची माती वाहून गेल्याने तलाव बुजला होता. त्या तलावाची खोदाई करून परिसरातील आदिवासींना पाणीसाठा उपलब्ध करण्याच्या हेतूने

आदिवासींची तहान भागवण्यासाठी तलाव खणला
भिवंडी : आदिवासी भागातील तलावात गेल्या काही वर्षांपासून आसपासची माती वाहून गेल्याने तलाव बुजला होता. त्या तलावाची खोदाई करून परिसरातील आदिवासींना पाणीसाठा उपलब्ध करण्याच्या हेतूने रोटरी क्लब आॅफ ठाणे ग्रीनच्या अध्यक्षा व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी तलावाची खोदाई करून या स्तुत्य उपक्रमाची सुरुवात केली. दरम्यान, टंचाई दूर होण्याबरोबरच तलावातील पाण्यामुळे शेती आणि भाजीपाल्याचा रोजगारही मिळणार आहे.
तालुक्यातील पायगाव ग्रामपंचायत हद्दीत भोयाचापाडा व ठाकूरपाडा हे ८००लोकवस्तीचे पाडे आहेत. या परिसरातील आदिवासी बांधवांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत होती. या आदिवासी भागात मुलांच्या शिक्षणासाठी शाळेला मदत करण्याच्या हेतूने रोटरी क्लब आॅफ ठाणे ग्रीनच्या अध्यक्षा डॉ. चित्रादेवी चव्हाण व त्यांचे सहकारी यांनी भोयाचापाडा व ठाकूरपाडा येथे भेट दिली. या पाड्यातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शेतीकरिता व जनावरांसाठी दीड एकर जागेत तलाव बांधलेला होता. मात्र, शेजारील डोंगरमाथ्यावरून वाहत आलेल्या मातीने तलाव पूर्णपणे बुजून गेला होता. ही माहिती उपस्थित रोटरीच्या पदाधिकाऱ्यांना समजल्याने त्यांनी पिण्याच्या पाण्यास प्राधान्य देत तलाव खोदाईचा संकल्प केला. या तलाव खोदाईमुळे परिसरातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
गुरुवारी सकाळी रोटरी क्लबचे डिस्ट्रीक्ट प्रेसिडेंट डॉ.चंद्रशेखर कोलवेकर यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन झाले.
पाड्यात बुजलेल्या तलावाची खोदाई रोटरी क्लब स्वखर्चातून करणार आहे. तसेच तळ्यातील पाण्यातून शेती व भाजीपाल्याचा रोजगार मिळणार आहे.
त्याचबरोबर या संस्थेद्वारे आदिवासी पाड्यातील शाळा डिजिटल करून या बांधवांना व समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे कामही लवकर हाती घेणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. (प्रतिनीधी)