शहापुरात आदिवासी संस्कृती उत्सव
By admin | Published: January 23, 2017 05:25 AM2017-01-23T05:25:23+5:302017-01-23T05:25:23+5:30
शहापूर तालुक्यात पहिला राज्यव्यापी आदिवासी संस्कृती कला उत्सव होत असून आदिवासी समाजाच्या संस्कृती तसेच कलेचा
शहापूर : शहापूर तालुक्यात पहिला राज्यव्यापी आदिवासी संस्कृती कला उत्सव होत असून आदिवासी समाजाच्या संस्कृती तसेच कलेचा वैशिष्ट्यपूर्ण आविष्कार लवकरच अनुभवता येणार आहे.
२७ जानेवारीपासून या उत्सवाला सुरु वात होत असून आदिवासी समाजाच्या जुन्या रूढी, परंपरा नवीन पिढीने जोपासाव्या, त्याचप्रमाणे लोप पावत चाललेल्या कला आणि संस्कृतीचे दर्शन समाजाला घडावे, या हेतूने उत्सवाचे आयोजन केल्याचे शहापूरचे आ. पांडुरंग बरोरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. नाना विविध कार्यक्र मांची रेलचेल असलेला हा उत्सव सर्व तालुकावासीयांसाठी पर्वणी असल्याने या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन माजी आ. दौलत दरोडा यांनी केले आहे.
या उत्सवाचे अध्यक्ष आ. पांडुरंग बरोरा आहेत. आदिवासी समाजात एकूण ४५ जमाती असून प्रत्येक जमातीची कला संस्कृती ही वेगवेगळी आहे. या संस्कृतीचे दर्शन भावी पिढीला व्हावे, यासाठी या कला उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २७ ते २९ जानेवारी अशा तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवाची सुरुवात शोभायात्रेने होणार आहे. आदिवासी जनजागृती मेळावा, पारंपरिक नृत्य, हळदीकुंकू, होम मिनिस्टर, तारपानाचसह ढोल, तांबड व गौरीनाच आदींतून विविध संस्कृतींचे दर्शन घडवले जाईल. या कार्यक्र मासाठी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, माजी मंत्री मधुकर पिचड, पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री अंबरिश अत्राम, रवींद्र चव्हाण, अनुसूचित जमाती कल्याण समितीप्रमुख रूपेश म्हात्रे, खा. कपिल पाटील आदींसह राज्यातील आदिवासी तसेच शहापूर, मुरबाड, वाडा, इगतपुरी, जव्हार, कर्जत, कल्याण, अंबरनाथ, जुन्नर अशा अनेक तालुक्यांतील सर्व जमातींचे हजारोंच्या संख्येने समाजबांधव सहभागी होणार असल्याचे अध्यक्ष पांडुरंग बरोरा यांनी सांगितले. (वार्ताहर)