आदिवासींचे उभे पीक जेसीबीद्वारे केले नष्ट, १६० गुंठे क्षेत्रावरील पिकाचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 02:13 AM2020-10-28T02:13:10+5:302020-10-28T02:13:47+5:30
येऊर येथील घटनेच्या पाठोपाठ वाघेरे पाडा येथील या आदिवासी शेतकऱ्यांना शेतीच्या नुकसानीला तोंड द्यावे लागले आहे. त्यांच्या शेतात खरिपाचे पीक व विक्रीच्या दृष्टीने वाढवलेल्या गवताच्या शेतीवर जेसीबी फिरवून नासधूस केल्याचा त्यांचा आरोप आहे.
ठाणे : कल्याण तालुक्यातील कांबा गावाजवळील वाघेरेपाडा येथील तीन शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांवर व कापणीच्या गवतावर रविवारी रात्री ट्रॅक्टर व जेसीबी फिरवून ते नष्ट केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी मांडा टिटवाळा पोलीस ठाण्यात सोमवारी केली.
येऊर येथील घटनेच्या पाठोपाठ वाघेरे पाडा येथील या आदिवासी शेतकऱ्यांना शेतीच्या नुकसानीला तोंड द्यावे लागले आहे. त्यांच्या शेतात खरिपाचे पीक व विक्रीच्या दृष्टीने वाढवलेल्या गवताच्या शेतीवर जेसीबी फिरवून नासधूस केल्याचा त्यांचा आरोप आहे. सुरेश हिंदोळे यांच्या १२० गुंठे शेतीवरील पिकासह काथोड पुजारी यांचे व सावळाराम पुजारी या दोघा शेतकऱ्यांचे प्रत्येक २० गुंठे शेतातील पिकांचे प्रत्येकी लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या शेतजमिनीवर अतिक्रमण करण्याच्या हेतूने दसऱ्याच्या दिवशी हे कृत्य करणाऱ्यांच्या नावाचा उल्लेखही या शेतकऱ्यांनी तक्रारीत केला आहे.
आदिवासींच्या या शेतजमिनीच्या वादासंबंधी याआधीही कल्याण पोलीस ठाण्यात ॲट्रॉसीटीचे दोन गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यास न जुमानता पीक नष्ट करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे म्हणाले, एफआयआर नोंदवून घेण्यासाठी शेतकऱ्यांना बोलावले आहे, पण ते येत नाहीत.