आदिवासी विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित
By admin | Published: March 17, 2017 06:07 AM2017-03-17T06:07:47+5:302017-03-17T06:07:47+5:30
ठाणे जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक तसेच अन्य किरकोळ खर्च भागवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेपासून त
आसनगाव : ठाणे जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक तसेच अन्य किरकोळ खर्च भागवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेपासून तब्बल १५ हजारांहून अधिक विद्यार्थी वंचित राहिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आल्याने आदिवासी विकास विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. याबाबत, श्रमिक मुक्ती संघटनेच्या इंदवी तुळपुळे यांनी राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या सचिवांकडे एक निवेदन दिले आहे.
२०१०-११ पासून इयत्ता पहिली ते दहावीमध्ये शिकत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक तसेच अन्य किरकोळ खर्च भागवण्यासाठी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. याअंतर्गत दरवर्षी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी रु . १०००, पाचवी ते सातवीसाठी रु . १५००, तर आठवी ते दहावीसाठी २००० रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते.
यंदा मात्र नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन ३ महिने उलटले, तरी ठाणे जिल्ह्यातील एकाही विद्यार्थ्याला गेल्या वर्षातील शिष्यवृत्ती अद्याप मिळालेली नाही.
यामध्ये मुरबाड तालुक्यात पाच हजार ६३०, शहापूर तालुक्यात ९ हजारांहून अधिक तसेच कल्याण, अंबरनाथ, भिवंडी या प्रत्येक तालुक्यातील हजारो आदिवासी विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. सरकार आदिवासींसाठी दररोज नवनवीन आश्वासने, योजना जाहीर करते. (वार्ताहर)