आदिवासींना ‘रताळ्यां’चा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 12:01 AM2020-09-22T00:01:29+5:302020-09-22T00:05:08+5:30
शेतीसोबत जोडधंदा : कोळशाचापाडा ‘रताळ्यांचे गाव’ म्हणून प्रसिद्ध
हुसेन मेमन।
लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : जव्हार तालुक्यातील कोळश्याचापाडा हे डोंगराळ भागातील गाव ‘रताळ्याचे गाव’ म्हणून परिसरात प्रसिद्ध आहे. येथील ५० ते ६० आदिवासी शेतकरी रताळ्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेऊन त्याच्या विक्रीतून आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करीत आहेत. या उत्पादनाच्या लागवडीसाठी आवश्यक वेलींच्या विक्रीतून तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागत आहे. त्याचा फायदा या पिकाच्या क्षेत्र वाढीसाठी होत असून आदिवासींच्या सक्षमीकरणामध्ये रताळे उत्पादन महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
रताळे हे कंदमूळ असून आरोग्याच्या दृष्टीने उपायकारक रानमेवा आहे. त्यामुळे लोक हौशीने या गुणकारी रताळ्यांना विकत घेऊन खातात. रताळे कोणी उकळून खातो, तर कोणी भाजून खातो. खाण्यासाठी गोड असल्यामुळे नागरिकांचा हा आवडता रानमेवा आहे. कमी खर्चात चांगले उत्पन्न देणारा हा शेतीसोबत असलेला जोडधंदा असून या काळात येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात रताळेलागवड करीत आहेत.
रताळी लागवडीसाठी उतार आणि उत्तम निचºयाची जमीन या पिकासाठी आवश्यक असते. टेकडीच्या उतारावरील वरकस जमिनीत हे पीक घेता येते. ६० सें.मी. अंतरावर वरंबे जमिनीच्या उतारास काटकोनात करून त्याची लागवड
केली जाते.
कोकण अश्विनी, वर्षा किंवा श्रीवर्धनी या जातींचा वापर केला जातो. तसेच कोसबाडच्या कृषी विज्ञान केंद्राने रताळी पिकांवरील सोंड्या भुंग्याच्या नियंत्रणाबाबत प्रात्यक्षिके आयोजित केली. त्यामुळे किडीस आळा बसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
एका एकरात रताळीलागवड केली आहे. त्याकरिता प्रतिजुडी २० रुपयांप्रमाणे दोन हजार रुपयांचे बेणे लागले. या हंगामात पाण्याची आवश्यकता नाही. तीन महिन्यांत उत्पादन मिळेल. त्याचा आहारात समावेश करून कुटुंबाला पोषण मूल्य तर विक्रीतून रोख रक्कम मिळेल. -पांचू चिभडे, शेतकरी, न्हयाळे, सुतारपाडा, जव्हार