येऊर येथील आदिवासी पर्यटनस्थळाला मिळणार चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 01:04 AM2020-01-16T01:04:46+5:302020-01-16T01:05:09+5:30
जागा करणार हस्तांतरित : पालिकेच्या महासभेपुढे प्रस्ताव मांडणार
ठाणे : येऊर येथील आदिवासी पर्यटनस्थळाला आता चालना मिळणार असल्याचे दिसत आहे. यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी संरक्षित नसलेली येऊरमधील एक जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला असून त्यासाठी पैसे भरण्याची तयारी महापालिकेने दाखविली आहे.
येऊर हा शांत परिसर म्हणून ओळखला जातो. त्यानुसार, याठिकाणची ओळख कायम राहावी, तसेच येथील ग्रामीण सौंदर्यात भर पडण्यासाठी आदिवासी पर्यटनस्थळ विकसित केले जाणार आहे. त्यानुसार, मागील काही दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. परंतु, हा परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिक्षेत्रामध्ये येत असल्याने काही सोपस्कार करणे शिल्लक होते. महापालिकेने वनविभागाच्या सहकार्याने याठिकाणी आदिवासी पर्यटन केंद्र विकसित करण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेतला होता. या केंद्राच्या उभारणीसाठी चार कोटी ८६ लाख २० हजार रु पयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. देशविदेशांच्या पर्यटकांना जंगलाची आणि आदिवासी संस्कृतीची माहिती मिळावी, या उद्देशातून हे केंद्र विकसित केले जाणार असून त्यासाठी येऊरमधील जागेची निवड करण्यात आली होती. या जागेवर आदिवासी पर्यटन केंद्र विकसित करण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव महापालिकेने वनविभागास दिला होता. या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या प्रधान सचिवांनी येऊरमधील त्या जागेचा पाहणी दौरा केला होता. त्यावेळी केंद्रासाठी प्रस्तावित करण्यात आलेली जागा संरक्षित वनक्षेत्र असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली होती. त्यामुळे महापालिकेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अडचणीत आला होता. दरम्यान, वनविभागाने आता या प्रकल्पासाठी येऊरमधील संरक्षित नसलेली जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी २० लाख रु पये भरण्याची तयारी महापालिकेने दाखविली आहे. यासंबंधीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने येत्या सोमवारी होणाऱ्या महासभेपुढे मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून कागदावर असलेला हा प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
नवीन जागा केली प्रस्तावित
येऊरमध्ये आदिवासी पर्यटन केंद्रासाठी यापूर्वी सुमारे नऊ हजार चौरस मीटर जागा प्रस्तावित होती. मात्र, ती संरक्षित असल्याने दुसरी जागा प्रस्तावित करण्यात आली. नवीन जागेत प्रवेश, स्वागत कक्ष, सभागृह, प्रदर्शन केंद्र व निवासव्यवस्था केली जाणार आहे. मातीच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचीही व्यवस्था येथे राहील.