आदिवासीपाड्यांच्या घशाला कोरड; हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 02:25 AM2019-04-22T02:25:19+5:302019-04-22T02:25:38+5:30
भिवंडी तालुक्यातील चित्र; टंचाईकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
- रोहिदास पाटील
अनगाव: भिवंडी तालुक्यातील कांबे ग्रुपग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील पागीपाडा, वळणाचापाडा, गवणीपाडा, दामूचापाडा या चार आदिवासीपाड्यांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत असून टंचाईकडे भिवंडी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
ठाणे जिल्हा परिषद व भिवंडी पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाच्या अंतर्गत येणाºया तालुक्यातील कांबे पंचायतीच्या या पाड्यात ऐन उन्हाळ्यात टंचाई निर्माण झाली आहे. बोअरवेललाही पाणी येत नसल्याने हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. पाणीपुरवठा विभागाकडे टँकरची मागणी केली आहे. प्रशासनातील अधिकारी मात्र आमच्यापर्यंत तक्रारी आलेल्या नसल्याने पाणीटंचाई नसल्याचा दावा करत असल्यामुळे महिला संतापल्या आहेत.
या पाड्यात बोअरवेल आहेत, परंतु पाणी नाही. पागीपाड्यातील बोअरवेलला दूषित पाणी येत असून दुर्गंधीही येते. पर्याय नसल्याने हे पाणी नागरिक पीत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विहीरही कोरडी पडली आहे. कांबेगावामधून पाणी सोडले जाते. पण, ते पाड्यांपर्यंत पोहोचत नसल्यामुळे येथील शेकडो आदिवासी कुटुंबांवर टंचाईचे संकट ओढवले आहे. याकडे ना अधिकारी, ना लोकप्रतिनिधी लक्ष देत, अशी व्यथा आदिवासींनी मांडली आहे.
एप्रिल महिन्याच्या प्रांरभीच पाणीटंचाई जाणवू लागल्याने भिवंडी पंचायत समिती, पाणीपुरवठा उपविभागाचे उपअभियंता, शाखा अभियंता यांना याची माहितीही नाही. दरवर्षी तालुक्यातील गावपाड्यांत पाणीटंचाई निर्माण होते. त्यावेळी नागरिक तक्र ारी करतात, तेव्हाच अधिकाºयांना जाग येते. प्रत्येक गट, गणांसाठी शाखा अभियंत्यांची नेमणूक केली आहे. ते पाड्यांवर फिरून आढावा का घेत नाहीत, सरपंच ग्रामसेवकांकडून पाणीटंचाईचा अहवाल का घेत नाहीत, ग्रामसेवकांनी माहिती दिलेली असते, मात्र येथील अधिकारी त्याकडे का दुर्लक्ष करतात, अशा कामचुकार अधिकाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाºयांनी केली आहे. भिवंडी तालुक्यात पाणीटंचाई जाणवत असतानाही अधिकारी मात्र नसल्याचे सांगतात. गेल्यावर्षी ‘लोकमत’ने टंचाईचे वृत्त प्रसिद्ध केल्यावर यंत्रणांची अक्षरश: पळापळ झाली होती.
गेल्यावर्षीही तालुक्यात पाणीटंचाई निर्माण झाली होती. पाणीटंचाईबाबत गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के, पाणीपुरवठा उपअभियंता राऊत, शाखा अभियंता सुदेश भास्करराव यांना निवेदन दिले होते. त्यानंतरही त्यांनी दुर्लक्ष केले होते. अखेर, श्रमजीवी संघटनेने हंडा मोर्चा काढल्यावर अधिकाºयांना जाग आली.
- मोतीराम नामकुडा, सचिव, श्रमजीवी संघटना
यासंबंधी माहिती घेऊन टंचाईची पाहणी करून ती दूर करण्यात येईल.
- अशोक सोनटक्के, गटविकास अधिकारी