विदारक आणि भयंकर परिस्थिती; ठाण्याच्या जवळ राहतो मात्र घोटभर पाण्यासाठी जीव जातो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 05:21 IST2025-02-11T05:19:22+5:302025-02-11T05:21:06+5:30
बोअरवेलला मातीचे पाणी, उलट्या, जुलाब, त्वचा विकाराने घराघरात माणसे आजारी

विदारक आणि भयंकर परिस्थिती; ठाण्याच्या जवळ राहतो मात्र घोटभर पाण्यासाठी जीव जातो
अजित मांडके
ठाणे : मुंबई ठाण्यात काय कमी असे राज्यभर वाटते. मात्र या दोन शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या आदिवासी महिलांना कित्येक वर्षापासून डबक्यातील पाणी प्यावे लागत आहे. बोरवेल मधून येणारे पाणी लाल रंगाचे असते. जमिनीतून मिळणाऱ्या पाण्याद्वारे अनेक आजार शरीरात येतात. पुढच्या २५ वर्षाची पाण्याच्या नियोजनाची ब्ल्यू प्रिंट तयार असल्याचा दावा महापालिका करते. त्यात आम्ही कुठे आहोत का? या प्रश्नावर मात्र सरकारकडे उत्तर नाही.
वस्तुस्थिती अत्यंत विदारक आणि भयंकर आहे. डोंगरावरील अत्यंत अरुंद व अवघड वाटेवरून या महिला मागील कित्येक वर्षांपासून डबक्यातील पाणी पीत आहेत. पानखंडा, देवाचा पाडा, बदानी पाडा येथील दीड दोन हजार लोक वस्ती असलेल्या रहिवाशांना पाण्यासाठी तीन बोअरवेलवर अवंलबून आहेत; मात्र त्यांना गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी येत असून, त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे.
या आदिवासी पाड्यांत दीड ते दोन हजारांची लोकवस्ती आहे. कित्येक वर्षांपासून हे रहिवासी पाण्यासाठी लढा देत आहेत. गढूळ पाण्यामुळे लहान मुलांना जुलाब, उलट्या, कावीळ आदी आजारांना सामोरे जावे लागते. महिलांना त्वचा विकारांना सामोरे जावे लागते. बोअरवेलला फडके बांधून पाणी भरले, तरी स्टीलचे हंडे माती साठून आतून लाल झाले आहेत. या भागात शाळा आणि आपला दवाखाना असून, त्यांना देखील बोअरवेलच्या किंवा डबक्यातील पाण्यावर अवंलबून राहावे लागते. बोअरवेल पाणी कमी असल्याने येथील महिलांना डोंगराची वेडीवाकडी वळणे एक किमी चढून पाणी आणावे लागते. येथील वाटा अतिशय धोकादायक आहेत; परंतु महिला आपल्या जीवाची पर्वा न करता डोक्यावर वेळप्रसंगी दोन-दोन हंडे घेऊन पाणी आणत आहेत.
पाण्यासाठी चालढकल
दोन वर्षांपूर्वी या भागात शाळेपर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली; परंतु त्याला अद्यापही पाणी आले नाही. जाब विचारला तर वनविभाग परवानगी देत नाही असे पालिका सांगते. तर, वन विभाग महापालिकेकडे बोट दाखवते असे ग्रामस्थ सांगतात.
बसची सुविधा नाही
ओवळा नाक्यापासून आदिवासी पाड्यावर जाण्यासाठी वाहनाची सुविधा नाही. विद्यार्थी दोन किमी चालत जात नाक्यावरून बस पकडतात. पाड्यामध्ये स्मशानभूमी बांधून दिली जात नसल्याने रहिवाशांना तीन ते चार किमी पायपीट करीत मोघरपाड्याला जावे लागते. जिवंतपणे पाणी नाही आणि मेल्यावर स्मशानभूमी नाही अशी यांची अवस्था आहे.
पानखंडा भागात शाळेपासून पुढील भागात पाण्याची समस्या आहे. या भागात जलवाहिन्या टाकल्या, पाण्याच्या टाक्याही बसविल्या; मात्र वन विभागाची अडचण असल्याने पाणी समस्या मार्गी लागलेली नाही; मात्र पाण्याची समस्या सोडविण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. - विनोद पवार, उपनगर अभियंता, पाणीपुरवठा विभाग, ठामपा