प्लाँटपाडा येथील आदिवासींची हंडाभर पाण्यासाठी धडपड सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:13 AM2019-04-28T00:13:25+5:302019-04-28T00:13:42+5:30
प्रशासनाकडून दखल नाही, बोअरवेलचे पाणीही दूषित, उपाययोजनांचा पत्ता नाही
किन्हवली : उन्हाच्या झळा वाढताहेत, तशी शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई उग्र रूप धारण करत आहे. आसनगावपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वेहळोली बु. ग्रामपंचायत हद्दीतील प्लाँटपाडा या आदिवासी वस्तीत तीव्र टंचाई निर्माण झाली असून हंडाभर पाण्यासाठी आदिवासी वणवण करत आहेत. मात्र, प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतलेली नाही.
वेहळोली बु. ग्रामपंचायत हद्दीत प्लाँटपाडा या आदिवासीवाडीचा समावेश आहे. शंभरहून अधिक घरे असलेल्या या वाडीत ३५० मतदार आहेत. अनेक वर्षांपासून या वाडीत पाणीपुरवठ्यासंदर्भात ठोस उपाययोजना न झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पाड्यात एक विहीर असून ती कोरडीठाक पडली आहे. शासनाने येथे दोन विंधण विहिरी दिल्या आहेत. मात्र, त्यातील एक विहीर कायमची बंद असून एका विहिरीतून तीन ते चार दिवसांआड एकदा पाणीपुरवठा होतो आहे. पण, तोही कमी प्रमाणात असल्याने हंडाभर पाण्यासाठी येथील महिलांना पाण्यासाठी कसरत करावी लागते आहे.
याठिकाणी एक बोअरवेल आहे. मात्र, या बोअरवेलशेजारीच एका खाजगी हॉटेलचे सांडपाणी साचून राहिल्याने या बोअरवेलचे पाणी दूषित झाले आहे. अनेक वर्षे याबाबत तक्र ार करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने या दूषित पाण्यावरच हे आदिवासी आपली तहान भागवत आहेत. गेली अनेक वर्षे या पाड्याची पाणीसमस्या कायम असून प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पाणीपुरवठा विभागाकडून त्या भागात कर्मचारी पाठवून माहिती घेऊन आवश्यक असल्यास त्या भागात तत्काळ पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करतो.
स्थानिक ग्रामस्थांशी बोलून अधिक काय करता येईल, त्याबाबत चर्चा करून आणि ग्रामस्थांशी बोलून अधिक काय उपाययोजना करता येईल, त्याबाबत चर्चा करू, असे उपअभियंता एम. आव्हाड यांनी यावेळी सांगितले.
अनेक वर्षांपासून पाणीटंचाईशी सामना
अनेक वर्षे आमच्या वाडीत पाणीटंचाई असते. परंतु, उन्हाळ्यात जास्त पाणीटंचाई निर्माण होत असून वाडीत असलेल्या बोअरवेलचे पाणीदेखील खाजगी हॉटेलच्या सांडपाण्यामुळे दूषित झाले आहे. प्रशासनाने यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- प्रशांत गडगे, सामाजिक स्थानिक कार्यकर्ते