Jayant Savarkar: समता विचार प्रसारक संस्थेची जयंत सावरकरांना आदरांजली!
By प्रज्ञा म्हात्रे | Published: July 24, 2023 03:18 PM2023-07-24T15:18:41+5:302023-07-24T15:19:23+5:30
Jayant Savarkar: एक हरहुन्नरी व रंगमंच - चित्रपटांत रसरसून काम करणारा कलाकार म्हणून जयंत सावरकर कायम स्मरणात राहतील. माजिवडा येथे अत्यंत साधं व समाधानी आयुष्य व्यतित करणारे जयंत सावरकर २०१९ साली वंचितांचा रंगमंचावर ६ वा युवा नाट्य जल्लोषला प्रमुख पाहुणे या नात्याने ते आले होते
- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : एक हरहुन्नरी व रंगमंच - चित्रपटांत रसरसून काम करणारा कलाकार म्हणून जयंत सावरकर कायम स्मरणात राहतील. माजिवडा येथे अत्यंत साधं व समाधानी आयुष्य व्यतित करणारे जयंत सावरकर २०१९ साली वंचितांचा रंगमंचावर ६ वा युवा नाट्य जल्लोषला प्रमुख पाहुणे या नात्याने ते आले होते. ते अत्यंत मनमिळावू व निगर्वी स्वभावाचे होते याची प्रचिती त्यावेळी आली होती, अशा शब्दात समता विचार प्रसारक संस्थेच्या अध्यक्ष हर्षलता कदम व सचिव अजय भोसले यांनी जयंत सावरकरांप्रतीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. जयंत सावरकरांनी नाट्यजल्लोषला भरभरून पाठींबा दिल्याच्या आठवणी त्यांना विनम्र आदरांजली वहातांना संस्थेने जागवल्या आहेत.
सावरकरांनी त्यावेळी नाट्यजल्लोष मध्ये युवकांनी सादर केलेल्या मेट्रो व वृक्ष कत्तल, एचआयव्ही एड्स ग्रस्तांचं जीणं, महिला सक्षमीकरणासाठी निर्भयता आदी ज्वलंत विषयांवरील नाटिका पाहून कलाकारलकार्यकर्त्यांचे व त्यांना प्रेत्साहन देणाऱ्या समता संस्थेचे अपार कौतुक केले होते. वंचित समुहांना आपल्या भावना, समज व समस्या आपल्या भाषेत व शैलीत मांडण्याची संधी देणारा नाट्य जल्लोष हे आपल्या समाजाचे व नाट्य विश्वाचे वैभव आहे, अशा शब्दात त्यांनी वंचितांचा रंगमंचाचा गौरव केला होता. संस्थेच्या मते सावरकरांच्या निधनाने, आपण कलाविश्वाचे वैभव गमावले आहे. कलाविश्वाला व विशेषतः वंचितांचा रंगमंचाला जयंत सावरकरांची उणीव नक्कीच जाणवत राहील!