दहा थर लावणाऱ्या पथकाला २१ लाख; मनसेची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 03:57 AM2018-08-20T03:57:27+5:302018-08-20T03:57:51+5:30
गेल्या वर्षी १० थरांना ११ लाखांचे पारितोषिक ठेवणाऱया मनसेने यंदा आपल्या बक्षिसाची रक्कम चांगली वाढवली आहे.
ठाणे : गेल्या वर्षी १० थरांना ११ लाखांचे पारितोषिक ठेवणाऱया मनसेने यंदा आपल्या बक्षिसाची रक्कम चांगली वाढवली आहे. मनसे आयोजित यंदाच्या दहीहंडीत १० थरांचे मनोरे रचणाºया मंडळाला तब्बल २१ लाख रुपये रोख देण्याचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे यंदाची दहीहंडी कोण फोडणार? १० थर लागणार का, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.
दहीहंडी उत्सवाचे पडघम वाजू लागले आहेत. गोविंदांचा सराव जोर धरू लागला आहे. दुसरीकडे आयोजकही तयारीला लागले आहेत. मोठ्या रकमांची दहीहंडी उत्सव आयोजित करणाºया ठाण्यातील काही आयोजकांनी अद्याप आपल्या पारितोषिकांच्या रकमा जाहीर केल्या नसल्या, तरी मनसेने गुरुवारी आपल्या पारितोषिकाची रक्कम सोशल मीडियावर जाहीर केली. आपल्या दहीहंडी उत्सवात १० थर लावणाºया पथकाला मनसे ठाणे शहर २१ लाख रुपये रोख, तर नऊ थर लावणाºया पथकाला ११ लाख रुपये रोख देणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. गेल्या वर्षी मनसे ठाणे शहर आयोजित दहीहंडी उत्सवात १० थर लावणाºया पथकाला ११ लाख रुपये रोख पारितोषिक जाहीर केले होते. यावेळी बोरिवलीच्या शिवसाई गोविंदा पथकापाठोपाठ जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकाने नऊ थरांची सलामी दिली होती. परंतु, शिवसाई गोविंदा पथकाने पहिल्याच प्रयत्नात नऊ थरांची सलामी देऊन विश्वविक्रमाची बरोबरी केली होती, तर जयजवान गोविंदा पथकाचा दोनदा १० थर लावण्याचा प्रयत्न फसला होता. तिसºयांदा मात्र त्यांनी नऊ थर लावून सलामी दिली होती. त्यामुळे दोघांना ११ लाखांचे बक्षीस विभागून देण्यात आले होते. याचवेळी बोरिवलीच्या बाळ मित्र मंडळाने साडेआठ थर लावले होते. यंदा ते नऊ थर लावणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले. गेली दोन वर्षे शिवसाई आणि जयजवान या गोविंदा पथकांनी मनसेच्या दहीहंडी उत्सवात नऊ थर रचले होते. यंदा या उत्सवाचे तिसरे वर्ष आहे. त्यामुळे १० थरांची दहीहंडी फोडून २१ लाखांचे पारितोषिक कोण पटकावणार, याची चर्चा रंगली आहे.
कलेला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व पारितोषिके हे रोख रकमेच्या स्वरूपात देण्यात येणार आहे.
- अविनाश जाधव,
जिल्हाध्यक्ष, ठाणे-पालघर