१८ लाखांची फसवणूक करणारे त्रिकूट जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 01:03 AM2020-11-26T01:03:36+5:302020-11-26T01:03:48+5:30
गुन्हे शाखेची कारवाई
ठाणे : बजाज फायनान्स कंपनीच्या अधिकृत डीलरचे आयडी आणि पासवर्डचा वापर करून ओपन व्हर्च्युअल कार्ड वेगवेगळ्या ग्राहकांच्या नावाने बनवून त्याद्वारे १८ लाख ६१८ रुपयांचे मोबाइल खरेदी करून फसवणूक करणाऱ्या मोहम्मद अल्तामश याच्यासह तिघा जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून सात लाख १३ हजारांचे ३० मोबाइल हस्तगत केले.
वागळे इस्टेट येथे कंपनीचे कार्यालय आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत मुंब्रा येथील अल्तामश उनावालाने बजाज फायनान्स कंपनीचा अधिकृत वितरक नसतानाही अन्सार टॉवेलवाला (३५, रा. मुंब्रा) आणि दीपेन सोमया (३१, रा. मुलुंड) यांच्या मदतीने ही फसवणूक केली. या टोळीने कंपनीचे राजस्थान, पंजाब, बिहारमधील अधिकृत डीलर यांचे लॉगइन आयडी तसेच पासवर्ड वापरून वेगवेळ्या ग्राहकांच्या नावाने ओपन व्हर्च्युअल कार्ड बनवून त्याच्या मदतीने १८ लाख १८ हजार ६१८ रुपयांचे मोबाइल कर्जाने खरेदी करून कंपनीची दिशाभूल केली. याप्रकरणी वागळे स्टेट पोलीस ठाण्यात कंपनीने १३ नोव्हेंबरला फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा समांतर तपास वागळे इस्टेट पोलीस आणि ठाणे गुन्हे शाखा युनिट-१ चे पथक करीत होते. दरम्यान, ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल, उपनिरीक्षक कैलास सोनवणे, हवालदार आबुतालीब शेख, सुभाष मोरे, सुनील जाधव आणि चंद्रकांत वाळुंज आदींच्या पथकाने या तिघांनाही १३ नोव्हेंबर रोजी मुंब्य्रातून अटक केली.
सात लाखांचे ३० मोबाइल हस्तगत
nआरोपींना पोलीस कोठडी मिळाली आहे. मोहम्मद अल्तामश हा बजाज फायनान्स कंपनीचा पूर्वाश्रमीचा डीलर होता. त्याच्याकडून विकलेल्या मोबाइलची कर्जवसुली होत नसल्याने कंपनीने त्याची डीलरशिप काढून घेतली होती.
nपरंतु, त्यानंतर त्याने कंपनीची फसवणूक केल्याचे उघड झाले. आरोपींकडून आतापर्यंत सात लाखांचे विविध कंपन्यांचे ३० मोबाइल हस्तगत केले आहेत.