ठाण्यातील मोटारसायकली चोरुन अल्प किंमतीमध्ये विकणाऱ्या त्रिकुटाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 08:58 PM2019-02-12T20:58:19+5:302019-02-12T21:30:50+5:30
ठाणे शहर, पनवेल, कळवा आणि मुंब्रा या परिसरातून मोटारसायकली चोरुन त्यांची विक्री करणा-या नवी मुंबईतील राजा शेख याच्यासह तिघांना ठाणे पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीतील २१ मोटारसायकली जप्त केल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली.
ठाणे: पनवेल, ठाणे शहर, मुंब्रा आणि कळवा या परिसरातील मोटारसायकली चोरुन त्या अल्प किंमतीमध्ये विकणा-या राजा शेख (२०, रा. धारावे गाव, नवी मुंबई), गना पठाण (२५, सीवूड, नवी मुंबई) आणि प्रशांत जुवळे (२३, रा. दिघा, नवी मुंबई) या त्रिकुटाला ठाणेनगर आणि कळवा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीतील २१ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. गेल्याच आठवडयात वाहने चोरणा-या नऊ जणांच्या टोळीला जेरबंद करुन त्यांच्या कडून चोरीतील ८० वाहने हस्तगत केली होती.
विशेष म्हणजे मोटारसायकली चोरणा-या दोघांना रंगेहाथ पकडण्यात यश आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली. तिन्ही आरोपींना १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठाणे शहरामध्ये दुचाकी वाहने चोरीस जाण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढले आहे. याची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दुचाकी वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर ठाणे शहर परिमंडळाचे पोलीस उपायुक्त स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर आणि कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांना दुचाकी चोरी होत असलेल्या ठिकाणांचा अभ्यास करुन पोलिसांच्या गस्तीची व्यूहरचना केली. गर्दीची आणि संशयास्पद ठिकाणांवर पोलीस पथकाने पाळत ठेवून सापळेही लावले. १ फेब्रुवारी २०१९ रोजी ठाणेनगर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सुदाम रोकडे आणि पोलीस शिपाई महेंद्र बच्छाव हे गस्त घालत असताना राजा शेख (रा.नेरुळ, नवी मुंबई, मुळ गाव अमरूल अच्छा , जिल्हा हसनाबाद, पश्चिम बंगाल ) याला ठाण्याच्या सिडको बस थांबा येथून मोटारसायकलची चोरी करतांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून बनावट चाव्या आणि स्क्रू ड्रायव्हर तसेच चोरीची ७० हजारांची मोटारसायकलही जप्त करण्यात आली. त्याच्या चौकशीतून गना पठाण (रा. सीवूड, नवी मुंबई) यालाही ताब्यात घेतले. या दोघांकडून चार लाख ३५ हजारांच्या ११ दुचाकी हस्तगत केल्या. ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातून तीन तर पनवेलमधून चोरलेल्या दोन असे पाच गुन्हे त्यांच्याकडून उघड झाले. उर्वरित सहा दुचाकींचे इंजिन आणि चेसिस क्रमांकावरुन मालकांचा शोध घेण्यात येत असल्याचे स्वामी यांनी सांगितले.
.........................
इंजिन क्रमांकामध्ये फेरफार करुन विक्री
या दोघांपैकी पठाण हा दुचाकी दुरुस्तीचा व्यवसाय करतो.
गाडी चोरल्यानंतर राजा मोटारसायकलीच्या क्रमांकाची प्लेट आणि इंजिन क्रमांकामध्ये फेरफार करुन त्यांची पाच ते १५ हजारांमध्ये विक्री करीत होता. या पैशांमधून ते मौजमजा करीत असल्याची कबूली त्यांनी दिली. ७० हजारांची गाडी अगदी १० ते १५ हजारांमध्ये मिळत असल्याचे पाहून एका रेल्वे तिकीट तपासणीसाने आणि अन्य काहींनी या दुचाकी खरेदी केल्या. अशा प्रकारे चोरीची गाडी घेणाºयालाही अटक केली आहे.
................................
दरम्यान, कळवा पोलीस ठाण्याच्या गस्त पथकातील कॉन्स्टेबल संतोष ढेबे हे गस्तीवर असतांना त्यांनी प्रशांत जुवळे याला संशयास्पदरित्या फिरतांना पकडले. त्यांच्या अंगझडतीमध्येही वाहन चोरीसाठी लागणारी सामुग्री मिळाली. त्याला ‘बोलते’ केल्यानंतर कळवा परिसरातून आठ तर मुंब्रा भागातून दोन अशा सुमारे दहा लाख रुपये किंमतीच्या दहा मोटारसायकली चोरल्याची त्याने कबूली दिली. प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) जमा झालेली वाहने सोडवून त्या दुरुस्त करुन विक्री करीत असल्याची बतावणी करुन तो या चोरीच्या दुचाकी विकत असल्याचेही तपासात उघड झाले. चोरीतील एक गाडी स्वत:कडे ठेवून रत्नागिरी, खेड येथील व्यक्तीला तसेच एमआयडीसीतील कामगारांना त्याने अल्प किंमतीत विकल्याचेही उघड झाले.
‘‘चोरीची वाहने विकत घेणा-यांवरही कारवाई होणार
चोरीच्या वाहनांचा उपयोग घातक कारवायांसाठी तसेच सोनसाखळी चोरी, दरोडा किंवा अन्य गुन्हेगारी कारवायांसाठीही देखिल त्यांचा उपयोग होण्याची भीती असते. त्यामुळे आरटीओ किंवा बँकेने जप्त केलेली वाहने असल्याची सांगून चोरीची वाहने विकणा-यांपासून सावधानता बाळगा. चोरीतील वाहन खरेदी करणा-यांवरही कारवाई केली जाणार आहे. आपली वाहने किंवा पार्र्किंग लॉटमध्येच उभ्या कराव्यात. चांगले लॉक आणि जीपीएस यंत्रणाही वाहनांना बसवावे. चोरीची गाडी विकणाºयांवर संशय आल्यास पोलिसांशी संपर्क साधा.
डॉ. डी. एस. स्वामी, पोलीस उपायुक्त, ठाणे शहर’’