राजस्थानातून ठाण्यात गांजाची तस्करी करणारे त्रिकुट जेरबंद; १० लाखांचा १०० किलो गांजा जप्त
By जितेंद्र कालेकर | Published: December 5, 2022 06:13 PM2022-12-05T18:13:27+5:302022-12-05T18:13:36+5:30
राजस्थानातून ठाण्यातील घोडबंदर रोड भागात तस्करीसाठी गांजा घेऊन आलेल्या महिपालसिंग चुण्डावत (२७) याच्यासह तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचच्या पथकाने अटक केली.
ठाणे: राजस्थानातून ठाण्यातील घोडबंदर रोड भागात तस्करीसाठी गांजा घेऊन आलेल्या महिपालसिंग चुण्डावत (२७) याच्यासह तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून दहा लाखांच्या १०० किलो गांजासह १९ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी सोमवारी दिली.
एक टोळके ठाण्यातील घोडबंदर रोडवरील ओवळा नाका येथे एका मोटारकारमधून सुमारे ६० ते ७० किलो वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ घेऊन तस्करीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश महाजन यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील आणि सहायक पोलिस आयुक्त राजकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके, अरुण क्षिरसागर, सहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण शिंदे, अविनाश महाजन, उपनिरीक्षक शिवाजी कानडे, जमादार शशिकांत सालदुर, हवालदार सुनिल रावते आणि रोहीदास रावते आदींच्या पथकाने सापळा रचून संशयितरित्या फिरणारी मोटारकार ३ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान ताब्यात घेऊन तिची झडती घेतली.
त्यावेळी या वाहनातील महिपालसिंग याच्यासह रमेशचंद्र बलाई आणि प्रमोद गुप्ता या त्रिकुटाकडून गाडीच्या डिक्कीत लपविलेला आठ लाखांचा ८० किलो गांजा हस्तगत केला. गुप्ता याने एका बंद हॉटेलमध्ये लपविलेला २० किलो गांजाही चौकशीनंतर हस्तगत केला. या त्रिकुटाकडून एकूण दहा लाखांचा १०० किलो गांजा, मोटारकार, मोबाईल आणि रोकड असा १९ लाख २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर या तिघांना अटक केली आहे. तिघांनाही ठाणे न्यायालयाने ९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. उपनिरीक्षक शिवाजी कानडे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. तिघांनाही ठाणे न्यायालयाने ९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.