व्हेल माशाच्या दुर्मीळ २० कोटींच्या उलटीची तस्करी करणाऱ्या त्रिकुटास ठाण्यातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 10:17 PM2018-10-03T22:17:58+5:302018-10-03T22:26:24+5:30
व्हेल माशाच्या उलटीने निर्माण झालेल्या दगडाची तसेच खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करणा-या काशिनाथ पवार , दिलीप बिर्जे आणि ज्ञानेश्वर मोरे या तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ ने मंगळवारी अटक केली.
ठाणे : अत्यंत दुर्मीळ समजल्या जाणा-या व्हेल माशाच्या उलटीने निर्माण झालेल्या दगडाची तसेच खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करणा-या काशिनाथ पवार (५०, रा. पोलादपूर, जि. रायगड), दिलीप बिर्जे (४९, रा. साखरी आगार, जि. रत्नागिरी) आणि ज्ञानेश्वर मोरे (४०, रा. चरई वडाचा कोंड, जि. रायगड) या तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ ने मंगळवारी अटक केली. उच्च प्रतीचे अत्तर बनवण्यासाठी वापरल्या जाणा-या व्हेलच्या उलटीची आंतरराष्टÑीय बाजारपेठेत सुमारे २० कोटी, तर मांजराच्या खवल्यांची २० लाख रुपये इतकी किंमत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली.
ठाण्याच्या खारेगावातील अमित गार्डन या हॉटेलजवळ खवले मांजराच्या खवल्यांच्या तसेच व्हेल माशाच्या उलटीच्या विक्रीसाठी एक टोळी ठाण्यात येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांना मिळाली होती. त्याआधारे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने २ आॅक्टोबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास खारेगावात सापळा लावून या तिघांना अटक केली. झडतीमध्ये खवले मांजराचे लहानमोठ्या आकाराचे सुमारे सहा किलो दोन लाखांचे खवले पवार याच्या ताब्यातून जप्त केले. व्हेल माशाच्या वांतीचा (उलटी) आयताकृती पिवळसर तांबट रंगाचा दगडही जप्त केला. त्याचे वजन १० किलो ९०० किलोग्रॅम आहे. हा दगड दिलीपच्या ताब्यातून घेण्यात आला. या दोन्ही दुर्मीळ वस्तूंची मोरे याच्यामार्फत विक्री होणार होती. तत्पूर्वीच ठाणे पोलिसांनी त्यांना जेरबंद केले. तिघांचेही चार मोबाइल आणि ज्या गाडीतून त्यांनी हा ऐवज आणला, ते वाहनही जप्त करण्यात आले.
याप्रकरणी या तिघांविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांनाही ६ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत मिळाली आहे. व्हेलच्या उलटीचा उच्च प्रतीचे अत्तर बनवण्यासाठी युरोपियन देशांमध्ये उपयोग केला जातो. त्याचा दगड गुहागरच्या समुद्रकिनारी मिळाल्याचा दावा आरोपींनी केला आहे.
-------------
असा मिळतो उलटीचा दगड
व्हेल माशाने समुद्रात उलटी केल्यानंतर त्या उलटीचा तवंग समुद्राच्या पाण्यावर पसरुन त्याचा दगड बनून तो किना-यावर येतो. याच दगडाच्या लहानातल्या लहान अंशापासून उच्च प्रतिचे अत्तर बनविण्यासाठी उपयोग केला जातो, अशी माहिती पोलिसांनी दिली.