जलवाहतुकीमुळे ट्रिपल बचत धमाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 04:30 AM2018-05-03T04:30:20+5:302018-05-03T04:30:20+5:30
ठाणेकरांना येत्या काही महिन्यांत जलवाहतुकीची सफर करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. येत्या काही दिवसांत पहिल्या टप्प्याच्या कामाला सुरुवात होणार
- अजित मांडके
ठाणे : ठाणेकरांना येत्या काही महिन्यांत जलवाहतुकीची सफर करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. येत्या काही दिवसांत पहिल्या टप्प्याच्या कामाला सुरुवात होणार असून, या टप्प्यात वसई - मीरा-भार्इंदर - ठाणे-कोलशेत, घोडबंदर रोड, साकेत - दिवा - भिवंडी - कल्याण तर दुसऱ्या टप्प्याचा डीपीआर तयार करण्याचे काम ठाणे महापालिकेने सुरू केले आहे. ठाणे ते गेटवे आॅफ इंडिया आणि ठाणे ते पनवेल तसेच जेएनपीटीला जोडणारा हा ‘फेज २’चा जलमार्ग आहे. डिसेंबर २०१८पर्यंत वसई - ठाणे - कल्याण या पहिल्या टप्प्यातील दोन ते तीन बोटी सुरू होतील असा विश्वासही ठाणे महापालिकेने व्यक्त केला आहे. खासगीकरणाच्या माध्यमातून म्हणजेच जीसीसी तत्त्वावर या बोटी धावणार आहेत. या जलवाहतुकीमुळे प्रवाशांचा वेळ, इंधन आणि पैसे असा ट्रिपल बचत धमाका तर होणार आहेच, शिवाय वाहतूककोंडीच्या व्यापातूनदेखील सुटका होणार आहे.
ठाणे महापालिका खाडीतून अंतर्गत जलवाहतूक सुरू करणार आहे. पहिल्या टप्प्यात वसई - मीरा-भार्इंदर - ठाणे-कोलशेत, घोडबंदर रोड, साकेत - दिवा - भिवंडी - कल्याण हा २५ नॉटीकल मैल म्हणजेच ४५ किमी लांबीचा ७० मिनिटांचा जलवाहतूक मार्ग प्रस्तावित आहे. त्यामुळे ठाण्यापासून कल्याण, वसई, मीरा-भार्इंदर, भिवंडी या शहरांपर्यंत जलवाहतूक सुरू करण्यात येणार आहे. यासाठी होणारा सुमारे ६५० कोटींचा निधी हा संपूर्णपणे केंद्राकडून मिळणार असल्याने पालिकेवरचा याकामी पडणारा खर्चाचा ताण कमी होणार आहे. तर कोलशेत येथे या जलवाहतुकीचे मल्टी मॉडेल हब हे विकसित केले जाणार आहे. ज्या ठिकाणी बोटी दुरुस्तदेखील केल्या जाणार आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील काम सुरू झाल्यानंतर ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ८ ते १० क्षमतेच्या दोन ते तीन बोटी घेतल्या जाणार असून, त्या डिसेंबर अखेरपर्यंत धावतील असा विश्वास पालिका आयुक्तांनी व्यक्त केला आहे.
१० ठिकाणी उभारली जेट्टी
जलवाहतुकीचे जाळे पसरवण्यासाठी ठाण्यात १० ठिकाणी जेट्टी उभारण्यात येणार आहे. कल्याण, डोंबिवली (ठाकुर्ली गाव), अंजुरदिवे, काल्हेर, पारसिक बंदर, कोलशेत, नागला बंदर, घोडबंदर गाव, मीरा-भार्इंदर आणि वसई किल्ला या ठिकाणी त्या असणार आहेत.दुसºया टप्प्याच्या कामाला होणार सुरुवात
जलवाहतुकीच्या ठाणे - कल्याण - वसई या ‘फेज १’ला केंद्राची तसेच राज्याची तत्त्वता मान्यता मिळाल्यानंतर आता ‘फेज २’चा डीपीआर तयार करण्याचे काम ठाणे महापालिकेने सुरू केले आहे. ठाणे ते गेटवे आॅफ इंडिया आणि ठाणे ते पनवेल तसेच जेएनपीटीला जोडणारा हा फेज २चा जलमार्ग आहे. दुसºया टप्प्यातील जलवाहतुकीमुळे २० टक्के रस्ते वाहतुकीचा भार हलका होणार असून, सध्या घोडबंदरहून मुंबईला जाण्यास जे दोन तास लागतात तो प्रवास १ तासाने कमी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
तीन स्तरांवर सुरू होणार जलवाहतूक
मालवाहू जलवाहतूक, प्रवासी आणि पर्यटन अशा तीन स्तरांवर जलवाहतूक सुरू होणार असल्याने पालिकेलादेखील यापासून चांगला महसूल मिळणार आहे. प्रवासी जलवाहतुकीमुळे रस्ते आणि रेल्वेवरील भार कमी होणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीनेदेखील ठाण्यात जलवाहतुकीचा विकास करण्यात येणार असल्याने पर्यटकांना ठाण्यात येण्यास वाव मिळणार आहे.
रस्त्यावरील ट्राफिक होणार शिफ्ट : या वाहतुकीमुळे शहरात रस्त्यावर होणारी ट्राफिक कमी होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. सध्या ठाण्यातील मुख्य चौक वाहनांमुळे गजबजले आहेत. त्यामुळे या वाहनांना किंबहुना खासगी वाहन चालकांना जलवाहतुकीचा पर्याय दिल्यास अंतर्गत भागात रस्त्यावर होणारी वाहतूक कमी होणार आहे. तसेच रेल्वे प्रवाशांचादेखील मोठा भार यामुळे कमी होणार आहे.
ठाणे ते मुंबईचा जलमार्ग
ठाणे (साकेत) पासून जलवाहतुकीला सुरुवात होणार असून, त्यानंतर कळवा - विटावा - मीठबंदर - ऐरोली - वाशी - ट्रॉम्बे - एलिफंटा - फेरी वार्फ - गेटवे आॅफ इंडिया.
ठाणे - नवी मुंबई मार्गाला साकेतपासून सुरुवात होईल. त्यानंतर वाशी - नेरूळ - बेलापूर - तळोजा तर एक मार्ग बेलापूर हा पनवेलला जोडण्यात येणार असून, व्हाया जुईनगरला जाणार आहे. तसेच अजून एक मार्ग जेएनपीटी आणि उरणमार्गे नेरूळला जाणार आहे.