मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागताची जय्यत तयारी; टेंभी नाक्याचे वातावरण भगवेमय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 04:44 PM2022-07-04T16:44:06+5:302022-07-04T16:48:31+5:30
महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच ठाण्याला मुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदे यांच्या रुपाने मिळाले आहे. त्यात मागील १२ ते १५ दिवसापासून शिंदे हे ठाण्यापासून आणि आपल्या घरापासून दूर होते.
ठाणे- मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे हे सोमवारी प्रथमच ठाण्यात येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी ठाण्यातील त्यांच्या समर्थकांनी केली आहे. टेंभी नाका ते शक्तीस्थळ हे संपूर्णपणे भगवेमय झाल्याचे दिसत होते. याठिकाणी भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. तर शक्तीस्थळावर ते प्रथम जाणार असल्याने त्या ठिकाणी व्हीआयपी डी तयार करण्यात आला असून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. तर आनंद आश्रम हा पूर्ण फुलांनी सजविण्यात आला असून आनंद दिघे यांच्या तसबीरीलादेखील फुलांची आरास करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच ठाण्याला मुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदे यांच्या रुपाने मिळाले आहे. त्यात मागील १२ ते १५ दिवसापासून शिंदे हे ठाण्यापासून आणि आपल्या घरापासून दूर होते. परंतु आता ते मुख्यमंत्री म्हणून ठाण्यात प्रथमच येत असल्याने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी ठाण्यातील त्यांच्या समर्थकांनी किंबुहना शिवसैनिकांनी केल्याचे दिसून आले.
एकनाथ शिंदे हे सुरुवातीला आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळाला भेट देणार असल्याने त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. तसेच याठिकाणी व्हीआयपी डी तयार करण्यात आला आहे. तसेच शक्तीस्थळ हे संपूर्णपणो फुलांनी सजविण्यात आले आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागताची जय्यत तयारी; टेंभी नाक्याचे वातावरण भगवेमय#Eknathshinde#Shivsenapic.twitter.com/c5z7WwMsw2
— Lokmat (@lokmat) July 4, 2022
दुसरीकडे ज्या आनंद आश्रमातून दिघे यांनी जिल्ह्याचा कारभार हाकला. त्या आनंद आश्रमाचे देखील आज रुपडे पालटल्या सारखे दिसत आहे. आनंद आश्रम देखील पूर्णपणे फुलांनी सजविण्यात आला आहे. तसेच याठिकाणी आनंद दिघे यांच्या तसबीरीला देखील फुलांची आरास करण्यात आली होती. तसेच दिघे यांच्या पुतळ्याजवळ देखील अशाच स्वरुपाची फुलांची सजावट करण्यात आली आहे. याठिकाणी देखील पोलीसांचा फौजफाटा सकाळ पासूनच सज्ज ठेवण्यात आला आहे.
याशिवाय या भागात भगवे झेंडे प्रमुख आकर्षण ठरत आहे. आम्ही आजही शिवसेनेत असल्याचे प्रतिक या झेंड्यांच्या रुपाने पहावयास मिळत आहे. टेंभी नाका, कोर्ट नाका, जांभळी नाका, शक्तीस्थळ आदी भागात भगवे झेंडे दिसत असून येथील वातावरणच भगवेमय झाल्याचे दिसत होते.