ऐन गर्दीच्या वेळेस घोडबंदर आणि खारेगाव टोलनाक्यावर ट्रक बंद, वाहतुकीची तीन तेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 03:56 PM2019-08-02T15:56:48+5:302019-08-02T16:01:31+5:30
घोडबंदरकराची दिवसाची सुरवात आज वाहतुक कोंडीनेच झाली. आनंद नगर भागात वळण घेताना ट्रक बंद पडल्याने दोन्ही बाजूकडील वाहतुक ठप्प झाली होती. दुसरीकडे ही कोंडी सुरळीत होत असतांना खारेगाव टोलनाक्यावरही एका तासात दोन ट्रक बंद पडल्याने या मार्गावरही वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.
ठाणे - मागील काही दिवसापासून घोडबंदर आणि भिवंडी - नाशिक महामार्गवर वाहतुक कोंडी होत आहे. त्यात शुक्रवारी सकाळी घोडबंदर भागातील आनंद नगर येथे वळणावर ट्रक बंद पडल्याने ठाण्याच्या दिशेने आणि पुढे घोडंबदरकडे जाणारी अशी दोनही बाजूची वाहतुक तब्बल दिड ते दोन तास ठप्प झाली होती. ही कोंडी सुटत नाही तोच खारेगाव टोलनाक्याजवळ एका तासात दोन ट्रक बंद झाल्याने या भागातही नाशिकच्या दिशेने जातांना माजिवड्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यात या महामार्गावर ठिकठिकाणी आणि उड्डाणपुलांवर सुध्दा खड्डे पडले असल्याने वाहतुक कोंडीत त्यात आणखी भर पडल्याचे दिसून आले. त्यामुळे सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले.
शुक्रवारची सकाळ घोडबंदरकरांना वाहतुक कोंडीची ठरली. सध्या या भागात मेट्रोच्या कामामुळे आधीच वाहतुकीचा वेग मंदावला आहे. त्यात आजच्या वाहतुक कोंडीने घोडबंदरकरांची आणखी डोकेदुखी वाढल्याचे दिसून आले. सकाळी ८ च्या सुमारास घोडबंदरच्या दिशेने जात असलेला ट्रक आनंद नगर येथे वळण घेत असतांना त्याच ठिकाणी बंद पडला. त्यामुळे घोडबंदरकडे जाणारी आणि घोडबंदरवरुन ठाण्याच्या दिशेने येणारी अशी दोनही बाजूची मार्गिका जाम झाली. त्यानंतर बुस्टरच्या सहाय्याने हा ट्रक बाजूला काढण्यात आला. तो पर्यंत दोनही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ही कोंडी सुरळीत करण्यासाठी वाहतुक पोलिसांना ११ वाजले. भर पावसात अगांवर रेनकोट घालून वाहतुक पोलिस ठिकठिकाणी वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करतांना दिसले. परंतु तरी सुध्दा ही कोंडी फोडण्यासाठी त्यांनाही तीन तासांची पराकाष्टा करावी लागली. तर या मार्गावरील रस्त्यावर, उड्डाणपुलावर आणि सेवा रस्त्यांवर खड्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे सुध्दा वाहतुक कोंडीत अधिकची भर पडलेली दिसून आली.
दुसरीकडे या मार्गावरील वाहतुक टप्याटप्याने सुरळीत होत असतांना दुसरीकडे भिवंडी - नाशिक महामार्गावर माजिवड्याच्या दिशेने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे भिवंडीच्या दिशेने जाणारा उड्डाणपुलावरही वाहतुक जाम झाली होती. खारेगाव टोलनाक्याजवळ एका तासाच्या कालावधीत दोन ट्रक बंद पडल्याने या मार्गावरही वाहतुक कोंडी झाली होती. तसेच पुढे मानकोली येथे या महामार्गावर खड्डे असल्याने आणि साकेत पुलावरही खड्डे पडल्याने वाहतुक कोंडीत आणखीनच भर पडल्याचे दिसून आले. त्यात अवजड वाहनांची वाहतुकही याच कालावधीत घोडबंदर आणि भिवंडीकडे जाणाऱ्या महामार्गावर आल्याने वाहतुक कोंडीत आणखीन भर पडल्याचे दिसून आले. ऐन कामावर जाण्याच्या वेळेसच सकाळी या तीन घटना टप्याटप्याने घडल्याने वाहतुक कामावर जाणाºया चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले.
रस्त्यांवर वाहनांची वाढत असलेली संख्या, मेट्रोचे सुरु असलेले काम, खड्यांमुळे वाहतुकीचा मंदावलेला वेग आणि त्यात घोडबंदर आणि खारेगाव टोलनाक्यावर वाहने बंद पडल्याने वाहतुक कोंडी झाली होती. आता हळू हळू वाहतुक पूर्वपदावर आली आहे.
(अमित काळे - पोलीस उपायुक्त, वाहतुक विभाग)