ठाण्यात पुन्हा ट्रक पलटी, सहा तास वाहतुकीची कोंडी; चुकीच्या दिशेने आलेल्या बस आणि दुचाकीस्वारांमुळे पुन्हा काेंडीत भर

By जितेंद्र कालेकर | Published: September 4, 2024 05:00 PM2024-09-04T17:00:41+5:302024-09-04T17:01:28+5:30

काेंडीमध्ये मुंबईकडे जाणारे अनेक मंत्रालयीन अधिकाऱ्यांसह शाळकरी मुलेही चार ते पाच तास या वाहतूक काेंडीमध्ये अडकल्यामुळे ठाणेकरांनी तीव्र संताप व्यक्त केला.

Truck overturned again in Thane, traffic jam for six hours; Buses and bikers coming in the wrong direction add to the chaos again | ठाण्यात पुन्हा ट्रक पलटी, सहा तास वाहतुकीची कोंडी; चुकीच्या दिशेने आलेल्या बस आणि दुचाकीस्वारांमुळे पुन्हा काेंडीत भर

ठाण्यात पुन्हा ट्रक पलटी, सहा तास वाहतुकीची कोंडी; चुकीच्या दिशेने आलेल्या बस आणि दुचाकीस्वारांमुळे पुन्हा काेंडीत भर

लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाण्यात सलग दुसऱ्या दिवशीही बुधवारी सकाळी पॅराफॉर्मल्डिहाइड या रसायनाने भरलेल्या ३४ टनाच्या बॅगा घेउन जाणारा ट्रक पातलीपाडा ब्रिजवर पलटी झाल्याची घटना घडली. त्यामुळे सकाळी ८.३० ते दुपारी २.३० या पाच ते सहा तासांच्या कालावधीमध्ये ठाणे ते घाेडबंदर या मार्गावर आधी वाहतूक काेंडी झाली. त्यानंतर अनेक खासगी बस आणि दुचाकीस्वारांनी घाेडबंदर ते ठाणे या मार्गावरही उलट दिशेने वाहने आणली. त्यामुळे घाेडबंदर ते ठाणे हा दुसराही मार्ग बंद पडला. त्यामुळे या काेंडीमध्ये मुंबईकडे जाणारे अनेक मंत्रालयीन अधिकाऱ्यांसह शाळकरी मुलेही चार ते पाच तास या वाहतूक काेंडीमध्ये अडकल्यामुळे ठाणेकरांनी तीव्र संताप व्यक्त केला. या अपघातात ट्रक चालक मोहम्मद रुजदार (५०) हा किरकोळ जखमी झाला असून तो ट्रॅक रस्त्याच्या एका बाजूला केल्यानंतर ही वाहतूक सुरळीत केल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.

ट्रक चालक रुजदार हा नवी मुंबई न्हावा शेवा येथून रसायनाने भरलेल्या बॅगा असलेला ट्रक घेऊन बावल-हरियाणा येथे निघाला होता. या ट्रक घोडबंदर रोडने जाताना पातलीपाडा उड्डाणपुलाजवळ आल्यावर ७.४५ वाजण्याच्या सुमारास उलटला. या अपघातात चालकाच्या उजव्या हाताला किरकोळ दुखापत झाली. यामुळे वाहतुक कोंडीला सुरुवात झाली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वाहतूक शाखेचे पाेलिस उपायुक्त पंकज शिरसाठ आणि वरिष्ठ पाेलिस निरीक्षक मंजूषा भाेगले यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या ट्रकमध्ये रसायनाने भरलेल्या बॅगा असल्यामुळे त्याची झळ या मार्गावरुन जाणाऱ्या वाहन चालकांसह वाहतूक पाेलिसांनाही बसली. अनेकांना डाेळयांनाही झळझळ झाली. याच दरम्यान, तीन माेठया हायड्रा मशीनच्या मदतीने उलटलेला ट्रक रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आला. हा ट्रक तीन तासांनी बाजूला करण्यात आला. याचदरम्यान पातलीपाडा ब्रिजच्या खालून जाणारा रस्ता पातलीपाडा ते हिरानंदानी इस्टेट हा वाहतुकीसाठी बंद केला हाेता. पातलीपाडा ब्रिजवरून घोडबंदरच्या दिशेने जाणारी वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. या अपघाताने सलग दुसऱ्या दिवशीही घोडबंदर रोडकडे जाणाऱ्या वाहिनीवर वाहतूक कोंडीचे चित्र पाहण्यास मिळाले.

शाळकरी मुलांची रखडपट्टी-
दुपारी शाळा सुटल्यानंतर अनेक मुले स्कूल बसमध्ये दाेन ते तीन तास अडकली हाेती. त्यामुळे दुपारच्या सत्रातील मुलांना नेण्यासाठी बसच उपलब्ध न झाल्याने पालकांना आपल्या वाहनांनी मुलांची शाळा गाठण्यासाठी माेठी कसरत करावी, लागल्याचे एका पालकांने सांगितले. अनेक मुले बसमध्येच अडकल्याने त्यांचे पालकही रडकुंडीला आले हाेते. तर याच मागार्वरुन मंत्रालय गाठणारे प्रशासकीय अधिकारीही काेंडीमध्ये अडकल्याने अनेकांनी महापालिका आणि वाहतूक पाेलिसांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

आधी पातलीपाडयाजवळ पुलावर रसायनाचा ट्रक पलटी झाला. हे रसायन धाेकादायक असल्यामुळे हा ट्रक बाजूला करण्यात अनेक अडचणी आल्या. त्यात चुकीच्या दिशेने आलेले वाहन चालक आणि ११ नंतर याच मार्गाने सुरु झालेली मालवाहू वाहनांची वाहतूक या सर्वच कारणांमुळे ही वाहतूक काेंडी झाली. ज्याठिकाणी अपघात झाला. त्याठिकाणी मेट्राे अधिकाऱ्यांच्या मदतीने रस्ता तातडीने दुरुस्त केला जाणार आहे. त्यामुळे पुन्हा अशी वाहतूक काेंडी हाेणार नाही.
पंकज शिरसाठ, उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, ठाणे शहर

Web Title: Truck overturned again in Thane, traffic jam for six hours; Buses and bikers coming in the wrong direction add to the chaos again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात