ठाण्यात माजीवडा ओव्हरब्रिजवर ट्रक उलटल्याने वाहतूक कोंडी
By जितेंद्र कालेकर | Published: May 22, 2024 09:27 PM2024-05-22T21:27:11+5:302024-05-22T21:27:42+5:30
घाेडबंदर ते मुंबई मार्गावर वाहतुकीचा खाेळंबा : उड्डाणपुलावरील वाहतूक खालच्या रस्त्यावर
ठाणे: ठाण्यात घाेडबंदर रोड ते मुंबईकडे जाणाऱ्या माजीवडा येथील ओव्हरब्रिजवर चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक ट्रक उलटून रस्त्यावर ऑइल सांडल्याची घटना बुधवारी सायंकाळी समोर आली. या अपघातामुळे या ब्रिजवरील सर्व वाहने खालच्या मार्गावर आल्याने घाेडबंदर ते मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर ऐन सध्याकाळी गर्दीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. अपघातग्रस्त ट्रक बाजूला केल्यानंतर ही वाहतूक तीन तासांनी सुरळीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यातील घाेडबंदर ते मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर माजीवडा उड्डाणपुलावर एक हेवी सिमेंट मिक्सर बुधवारी सायंकाळी ४:४५ वाजता चालक लखन याचे नियंत्रण सुटल्याने उलटला. या अपघातामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऑइलही सांडले होते. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कापूरबावडी वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंजूषा भोगले, वाहतूक शाखेचे कर्मचारी तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाने हायड्रा क्रेनसह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी रोडवर सांडलेल्या ऑइलवर माती पसरविली.
अपघातग्रस्त वाहन हायड्राच्या साहाय्याने रात्री ७ ते ८ वाजण्याच्या दरम्यान बाजूला करण्यात आले. या काळात हा मार्ग रोड वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात मोकळा करण्यात आला. मात्र, माजीवडा उड्डाणपुलावर यू टर्नजवळच हा अपघात झाल्याने घाेडबंदर ते मुंंबईकडे जाणारी सर्व वाहने ही पुलाऐवजी खालच्या रस्त्यावर आली. त्यामुळे या मार्गावर ऐन संध्याकाळी मोठी कोंडी झाली. माजीवडा ते अगदी पातलीपाड्यापर्यंत सायंकाळी ५:३० ते रात्री ७:३० वाजेपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या काळात वाहतूककोंडी फोडताना वाहतूक शाखेच्या पोलिसांची चांगलीच दमछाक झाल्याचे पाहायला मिळाले.
........................
चालकाचे पलायन -
उड्डाणपुलावरील अपघातानंतर मिक्सर ट्रकचालकाने पलायन केले. त्यामुळे नेमके काय झाले, याची सुरुवातीला पोलिसांनाही माहिती नव्हती.
......................
यू टर्नवर वारंवार अपघात
माजीवडा उड्डाणपुलावर घाेडबंदर ते मुंबईकडे जाणाऱ्या यू टर्नच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणारी काही कामे अपुऱ्या अवस्थेत आहेत. या ठिकाणी रमलर्स, टायर बसविणे आणि ब्लिंकर्सची गरज असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. या कारणांमुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याचे बोलले जात आहे.