मुंबई-नाशिक महामार्गावर ट्रक उलटल्याने कोळसा रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:39 AM2021-03-25T04:39:02+5:302021-03-25T04:39:02+5:30

ठाणे: छत्तीसगड येथून मुंबईला कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या दुसऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना बुधवारी ...

Truck overturns on Mumbai-Nashik highway | मुंबई-नाशिक महामार्गावर ट्रक उलटल्याने कोळसा रस्त्यावर

मुंबई-नाशिक महामार्गावर ट्रक उलटल्याने कोळसा रस्त्यावर

Next

ठाणे: छत्तीसगड येथून मुंबईला कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या दुसऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास मुंबई- नाशिक महामार्गावर घडली. या घटनेत कोळशाचा ट्रकचा क्लिनर आणि धडक देणाऱ्या ट्रकचा चालक असे दोघे जखमी झाले असून त्यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे.

ट्रकचालक सहजोद इक्बाल अहमद आणि क्लिनर मोसिम कासिम खान (२५) हे दोघे छत्तीसगड येथून कोळशाचा ट्रक घेऊन मुंबईला निघाले होते. ते मुंबई-नाशिक महामार्गावरील (मुंबई वाहिनीवर) ठाण्यातील साकेत पुलाशेजारी, रुस्तमजी टॉवरसमोरून २४ मार्च रोजी पहाटे १.२५ वाजण्याच्या सुमारास जात होते. त्याचवेळी पाठीमागून दुसरा चालक प्रमोद पाटोदकर हा धुळे ते मुंबई असा जनावरांच्या खुराकाने भरलेला ट्रक भरधाव वेगाने घेऊन जात होता. याचदरम्यान पाटोदकर यांच्या ट्रकने कोळशाच्या ट्रकला धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की कोळशाचा ट्रक रस्त्यावर जागीच उलटा झाल्याने त्यातील कोळसा संपूर्ण रस्त्यावर पसरला. अपघाताची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, वाहतूक पोलीस अधिकारी, राबोडी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान आदींनी घटनास्थळी धाव घेऊन जेसीबीच्या मदतीने महामार्गावरील कोळसा बाजूला केला. तर दोन हायड्रा क्रेनच्या मदतीने दोन्ही ट्रक महामार्गाच्या बाजूला केले. त्यानंतर मुंबई-नाशिक महामार्ग सर्व वाहनांसाठी मोकळा केला. या अपघातात ट्रक चालक प्रमोद पाटोदकर (३४) यांच्या डोक्याला आणि मानेला किरकोळ दुखापत झाली. तर उलटलेल्या ट्रकचा क्लिनर मोसिम कासिम खान यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. या दोघांनाही उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Truck overturns on Mumbai-Nashik highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.