संगमनेरहून नवी मुंबईकडे गोवंश मांसाची तस्करी करणारा ट्रक पोलिसांनी केला जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2017 08:50 PM2017-11-01T20:50:32+5:302017-11-01T20:51:00+5:30
भिवंडी : संगमनेरहून गोवंश मांसाने भरलेला ट्रक नवी मुंबईकडे जात असताना पडघा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आज बुधवारी दुपारी जप्त केला.
भिवंडी : संगमनेरहून गोवंश मांसाने भरलेला ट्रक नवी मुंबईकडे जात असताना पडघा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आज बुधवारी दुपारी जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मुंबई व नवी मुंबई येथे गोवंश मांसाची मोठ्या प्रमाणात विक्री करणा-या तळवली येथील कत्तल खान्यावर पडघा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी धाड घातली होती.
तसेच मागील आठवड्यात म्हापोली येथील कत्तल खान्यावर गणेशपुरी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी धाड घातल्याने गोवंश तस्करीचा व्यवसाय करणा-या गुन्हेगारांचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे त्यांनी तालुक्यातील गोवंशाचे कत्तलखाने बंद करून आपला मोर्चा तालुक्याबाहेर वळविला. याची खबर पडघा पोलीस ठाण्याला मिळाल्यानंतर त्यांनी मुंबई-नाशिक महामार्गावरील अर्जुनली टोलनाक्यावर आज दुपारी नाकाबंदी सुरू केली. तेव्हा संशयित ट्रकचालकाने आपला ट्रक पळविला.
पोलिसांनी त्याचा पाठलाग करून तळवली नाक्यावर एमएच१७/बीडी २५६९ हा पळालेला ट्रक पकडला. पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता त्या ट्रकमध्ये बर्फाच्या तुकड्यांमध्ये गोमांसांचे कोल्ड स्टोरेज केलेले आढळून आले. या बर्फाच्या पाण्यासोबत मांसाचे रक्तमिश्रित पाणी रस्त्यावर सांडू नये यासाठी ट्रकच्या डिझेल टाकीच्या विरुद्ध दिशेला डिझेल टाकी बनवून त्यामध्ये हे पाणी साठविले जात होते. ते रक्तमिश्रित पाणी निर्जन ठिकाणी टाकून दिले जात असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिल्याने हा ट्रक पकडून त्यामधील सात टन गोवंश मांस पोलिसांनी जप्त केले. हे मांस घेऊन वाशी नवी मुंबई येथील मयूर कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यास जात असल्याची कबुली ट्रक चालक निसार अब्दुल शेख(२८) व जाकीर खान नसीर खान(३६)यांनी दिल्याने त्यांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याविरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.