शेलगावातील खरे लाभार्थी मदतीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:49 AM2019-07-24T00:49:40+5:302019-07-24T00:50:00+5:30
मुरबाडची घटना : किरकोळ नुकसान झालेल्यांना झाला फायदा
मुरबाड : वादळी पावसामुळे शेलगाव परिसरात लाखो रूपयांचे नुकसान झाले. वादळात दहा ते पंधरा गावातील घरावरील छप्पर उडून गेल्याने अनेक कुटुंब उघड्यावर आली आहेत. या घटनेतील बाधितांना सरकारच्या वतीने तहसीलदार अमोल कदम यांनी मदत वाटप केली,मात्र यात खरे बाधित वंचित तर ज्यांचे किरकोळ नुकसान झाले त्यांना मात्र मदत दिली आहे .
तालुक्यातील शेलगाव व शिरोशी परिसरात १० जून रोजी वादळी पावसाने चांगलीच दैना केली होती. या परिसरात शेलगाव, शिरोशी, शाई, वनोटे, वेळूक, मांदोशीसह २० ते २५ गावात चक्र ीवादळात घरांची छप्परे उडाली. अनेकांच्या घरातील वस्तू , धान्य पाण्यात भिजले. यात विशेष म्हणजे शेलगाव येथील चंद्रकांत सासे, शिवाजी मुरेकर, मधुकर मुरेकर, कल्पना मुकणे, करीम शेख, इस्माईल बाबू शेख यांच्यासह जेमतेम चार ते पाच घरे वगळता संपूर्ण गावातील घरांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळी वाऱ्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित अहवाल तहसीलदार कार्यालयात पाठवावे असे आदेश आमदार किसन कथोरे व तहसीलदार अमोल कदम यांनी तलाठी, सर्कल यांना दिले.
या आदेशानुसार मंडळ अधिकारी व तलाठी हे शेलगाव येथे जाऊन त्यांनी तेथील जमीन खरेदी- विक्र ीचा व्यवसाय करणाऱ्यांचे घर गाठले तेथे बसून सरपंच, पोलीस पाटील यांच्याकडून नावे घेऊन पंचनामे केले. यामध्ये चंद्रकांत सासे यांच्यासह वरील कुटुंबांचे लाखाहून अधिक नुकसान झाले. तर काहींचे जेमतेम पाच पंचवीस कौले फुटलेली. मात्र पंचनामा करताना त्यांचेही नुकसान जास्त झाल्याचे दाखवले गेले. या सर्व नुकसानग्रस्तांना सरासरी सहा हजाराचे मदतीचे धनादेश दिले गेले. यामुळे ज्यांना जास्त मदतीची गरज होती त्यांच्यावर एकप्रकारे अन्याय झाला आहे.
ज्यांचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका उपाध्यक्ष सीताराम निमसे यांनी केली आहे.
१० जून रोजी शिरोशी परिसरात अचानक आलेल्या वादळाने शेलगाव, शाई या गावातील अनेक घरांचे पत्रे, कौले उडून नुकसान झाले आहे. हे खरे आहे. त्यांना प्रत्येक कुटुंबाला सहा हजार आर्थिक मदत दिलेली आहे. ही मदत सरकारच्या धोरणाप्रमाणे वाटप केली आहे.
- अमोल कदम, तहसीलदार, मुरबाड.
शेलगाव, शाई व परिसरातील गावात वादळी पावसाने अनेक घरांची मोठी हानी झाली आहे. सरकारने त्या नुकसानग्रस्तांना योग्य ती मदत द्यायला हवी होती; परंतु सहा हजार तुटपुंजी मदत देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. यात काही कुटुंबांचे खूप नुकसान झाले आहे. त्यांच्यावर हा अन्याय असून त्यांना योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी आम्ही सरकारकडे करणार आहोत.
- सीताराम निमसे, उपाध्यक्ष,भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मुरबाड तालुका