विजयासाठी भिस्त ‘आयाराम-गयाराम’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 01:12 AM2017-12-06T01:12:06+5:302017-12-06T01:12:14+5:30

जिल्हा परिषद - पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मुरबाडमध्ये उमेदवारांकडून प्रचारास प्रारंभ झाला असला, खासदारांसह आमदार सत्ताधारी भाजपाचे असले तरी मुूळचे भाजपा कार्यकर्ते मात्र या प्रचारकार्यात सक्रिय दिसून येत नाहीत.

Trusted for victory 'Aayaram-giram' | विजयासाठी भिस्त ‘आयाराम-गयाराम’वर

विजयासाठी भिस्त ‘आयाराम-गयाराम’वर

Next

सुरेश लोखंडे
मुरबाड : जिल्हा परिषद - पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मुरबाडमध्ये उमेदवारांकडून प्रचारास प्रारंभ झाला असला, खासदारांसह आमदार सत्ताधारी भाजपाचे असले तरी मुूळचे भाजपा कार्यकर्ते मात्र या प्रचारकार्यात सक्रिय दिसून येत नाहीत. एवढेच नव्हे तर जिल्हा परिषदेच्या आठ जागांंपैकी बहुतांशी ठिकाणी असंतुष्ट आयाराम -गयाराम म्हणजे ऐनवेळी पक्षात दाखल झालेल्यांना उमेदवारी देऊन विजयासाठी भाजपा त्यांच्यावर विसंबून असल्याचे आढळून आले.
एकेकाळी मुरबाड हा काँग्रेसचा बालेकिल्ला. माजी महसूलमंत्री शांताराम घोलप यांच्या निधनानंतर येथील काँग्रेस लयाला गेली. या पक्षातूनच राष्टÑवादीत येऊन आमदार झालेले गोटीराम पवार यांचे सत्ताकेंद्र भेदून भाजपाचे दिगंबर विशे आमदार झाले. आता भाजपाच्या जुन्या फळीतील कार्यकर्त्यांचा अन्यत्र कोठेही समावेश दिसत नाही. भाजपाचे खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे यांना अन्य पक्षांच्या असंतुष्टांचा घेराव आहे. जिल्हा परिषदेच्या उमेदवारीतही त्यांचीच वर्णी लागली. यामुळे भाजपाचे जुने कार्यकर्ते या निवडणुकीत दुरावलेले दिसत आहेत.
मुरबाडच्या कुडवली गटासाठी भाजपाने खास अंबरनाथच्या मांगळूरचे टीडीसीसी बँकेचे संचालक राजेश पाटील हा उमेदवार आयात केला आहे. श्रमजीवी, आरपीआयसोबत घेऊन भाजपा राष्टÑवादी - शिवसेना युतीचे सुभाष पवार यांच्यावर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात आहे. ही जागा या लोकप्रतिनिधींसाठी प्रतिष्ठेचे मानली जाते. यानंतरची प्रतिष्ठेची जागा म्हणून डोंगरन्हावे गटाकडे पाहिले जाते. या गटात सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्या पत्नी ज्योती हिंदुराव राष्टÑवादीच्या उमेदवार आहेत. त्यांची भाजपाचे उल्हास बांगर यांच्याशी लढत आहे. या गटावर हिंदुरावांचे वर्चस्व असले तरी या गटात मराठा मतदार अधिक आहे.

शिवळा गटातही ही स्थिती आहेत. या गटात भाजपाच्या शेती सेवा सोसायट्या, शिधावाटप दुकाने आदींसह ग्राम पंचायतींवर भाजपाचे वर्चस्व आहे. पण बाजार समितीचे सभापती रमाकांत सासे यांच्या पत्नी रंजना सेना- राष्टÑवादीच्या उमेदवार आहेत. या ठिकाणी राष्टÑवादीचे वर्चस्व आहे. यावेळी काँगे्रसनेदेखील सुमारे दहा ते १५ वर्षानंतर या निवडणुकांमध्ये उडी घेऊन दोन गटांसह तीन गणांमध्ये त्यांचे उमेदवार उभे केले आहेत. मतदारांचा कानोसा घेतला असता सत्ताधारी भाजपाला पर्याय म्हणून अन्य पक्षांकडे त्यांचा कल दिसून येत आहे.

महापोली गटात मेहुणे आमनेसामने
अनगाव : भिवंडी तालुक्यातील महापोली-अनगाव जिल्हा परिषद गटात भाजपा युतीचे रामचंद्र शेलार, तर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे किशोर जाधव हे सख्खे मेहुणे रिंगणात आमने-सामने उभे ठाकल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे.
महापोली-अनगाव जिल्हा परिषद गटातील अनगावमध्ये आणि महापोली गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. त्यांची शिवसेनेसह मनसे, आरपीआय सेक्यूलर याच्याशी युती असल्याने भाजपाचे लक्ष या गटाकडे आहे. पूर्वीच्या गणेशपुरी गटात आता नव्याने महापोली गट झाला आहे. तेथे मागील निवडणुकीत भाजपा-शिवसेनेची युती असतानाही राष्ट्रवादीने वर्चस्व कायम ठेवले होते. आताच्या निवडणुकीत भाजपाची श्रमजीवी संघटना, आरपीआय आठवले गटाशी युती असल्याने भाजपाचे खासदार कपिल पाटील, जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे, भाजपा किसान आघाडीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष यशवंत सोरे यांनी येथे कमळ फुलवण्यासाठी तयारी केली आहे
जिल्हा परिषद गटाचे दोन आणि पंचायत समिती गणाचे दोन असे चारही उमेदवार अनगावचेच असल्याने येथील मतदार संभ्रमात आहेत. पंचायत समिती गणातील आघाडीच्या शिवसेनेच्या ललिता जितेंद्र गायकर-जोशी यांचे माहेर सारर येथील आहे. युतीच्या माजी जिल्हा परिषद सदस्या राजेश्री राजाराम राऊत याही स्थानिक असल्याने ही निवडणूकही वेगवेगळ््या नातेसंबधात विभागलेली आहे. येथे युती आणि आघाडी दोघांचीही कसोटी आहे.

या निवडणुकीत अनेक नेत्यांनी, पक्षांनी काही कुटुंबातच उमेदवारी दिल्याने निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांत नाराजी आहे. लोकसभा निवडणुकीपासून ते थेट ग्रामपंचायत निवडणुकीपर्यंत आणि आता जिल्हा परिषद-पंचायतीच्या रिंगणातही जिल्ह्यात पाटील घराण्याचे वर्चस्व जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. ही मंडळी अशी : कपिल पाटील - खासदार, सिध्देश कपिल पाटील- सरपंच दिवे अंजूर ग्रामपंचायत, सुमती पुरूषोत्तम पाटील - नगरसेवक भिवंडी मनपा, प्रशांत पुरूषोत्तम पाटील- संचालक- ठाणे जिल्हा मजूर फेडरेशन, देवेश पुरूषोत्तम पाटील -उमेदवार -जिप अंजूर गट. या नावांवर नजर टाकल्यानंतर ही सर्व पदे एकाच कुटुंबात असल्याने भिवंडी तालुक्यासह परिसरात पाटील यांचाच वरचष्मा असल्याचे दिसून येते.अंबाडी गटात भाजपाचे कैलाश जाधव, शिवसेनेचे किशोर जाधव, मनसेचे विकास जाधव हे कुटुंबिय निवडणूक रिग्ांणात आहेत. मोहडूल जिप गटात भाजपाच्या संगीता संतोष जाधव आणि शिवसेनेच्या दिपाली दिलीप पाटील या मामे बहिणी, तर पूर्णा पंचायत समिती गणात शिवसेनेचे विकास भोईर, भाजपाचे योगेश भोईर हे भाऊ निवडणूक रिंगणात आहेत. महापोली गटात राष्टवादीचे किशोर जाधव, भाजपाचे रामचंद्र शेलार हे मेव्हणे-भावोजी निवडणूक लढवत असल्याने घराणेशाही आणि नातेसंबंधातच ही निवडणूक लढवली जात असल्याचे चित्र उभे राहिले आहे.

Web Title: Trusted for victory 'Aayaram-giram'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.