व्हॉट्सअॅप वादातून एकास जिवंत जाळण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 05:09 AM2019-06-14T05:09:27+5:302019-06-14T05:09:33+5:30
राणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे फिर्यादी हे १५ मे २०१९ ला बुलेटवरून जात असताना त्यांचा पाठलाग करून
नालासोपारा : राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील एकाला दोन तरूणांनी व्हॉट्सअपमुळे झालेल्या वादातून रस्त्यात अडवून मारहाण करून पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा १५ मे रोजी ला घडला होता. याप्रकरणी तेथील राणी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. फरार असलेल्या या आरोपींना बुधवारी वसईतून वालीव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी पकडून राणी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
राणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे फिर्यादी हे १५ मे २०१९ ला बुलेटवरून जात असताना त्यांचा पाठलाग करून सतपाल लिंबारामजी जणवा चौधरी (३०) आणि राजू लालचंद चौधरी (२८) या दोघांनी गाडी आडवी लावून अडवले. व्हॉट्सअप ग्रुपच्या पोस्ट वरून वाद घालत मारहाण केली. बाटलीमधील पेट्रोल फिर्यादीच्या अंगावर ओतल्यावर तो घाबरून बुलेट सोडून पळून गेला. सतपाल आणि राजूने बुलेट मोटारसायकलवर पेट्रोल टाकून ती जाळून टाकली. यानंतर पाली पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यावर ते फरार झाले होते.
ते दोघे वसई पूर्वेकडील वालीवच्या हद्दीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर धायरकर, पोलीस उपनिरीक्षक विजय चव्हाण, पोलीस कर्मचारी महेश बोडके, योगेश घुगे आणि वीरकर यांच्या टीमने मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाळत ठेवली असता बुधवारी या दोघांना महामार्गावरील वासमारे ब्रिजजवळ अटक केली.