एसटी डेपोची जागा हडपण्याचा प्रयत्न?

By admin | Published: March 23, 2016 02:14 AM2016-03-23T02:14:57+5:302016-03-23T02:14:57+5:30

रेल्वे स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्याच्या नावाखाली कल्याण-डोंबिवली महापालिकेने रेल्वे स्थानकालगत असलेल्या एसटी डेपोच्या जागेवर दावा सांंगितल्याचा

Trying to grab ST Depot space? | एसटी डेपोची जागा हडपण्याचा प्रयत्न?

एसटी डेपोची जागा हडपण्याचा प्रयत्न?

Next

कल्याण : रेल्वे स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्याच्या नावाखाली कल्याण-डोंबिवली महापालिकेने रेल्वे स्थानकालगत असलेल्या एसटी डेपोच्या जागेवर दावा सांंगितल्याचा विषय चर्चेत आला खरा, पण असा कोणताच प्रस्ताव एसटीकडे न गेल्याने पालिकेच्या नावाखाली काही व्यक्तींनी हा मोक्याचा भूखंड हडपण्याची चाचपणी केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
स्टेशनला लागूनच हा डेपो आहे आणि लांब पल्ल्याच्या प्रवाशांसह स्थानिक वाहतूक करणाऱ्या प्रवाशांसाठीही तो सोयीचा आहे. आधी पनवेल डेपोची मोक्याची जागा बळकावण्याच्या हालचालींनंतर आता कल्याणच्या जागेवर अनेकांचा डोळा आहे. मूळात सध्या रेल्वे स्थानक परिसर भरपूर मोकळा करण्यात आला आहे. ठाण्याप्रमाणे कल्याणलाही सॅटीस प्रकल्पाची चाचपणी सुरू आहे. त्यामुळे एसटीचा भूखंड ताब्याची घेण्याची गरज काय, असा प्रवाशांचा-एसटी कर्मचाऱ्यांचा सवाल आहे. आवश्यकताच असेल तर आधी न्यायालय, तहसीलदार कार्यालय, पोलीस ठाणे, अग्नीशमन दल यांना भरपूर मोकळी जागा देऊन त्यांचे स्थलांतर करा, राजकीय पक्षांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या बेकायदा रिक्षातळांवर कारवाई करा त्यातूनही जागा मोकळी झाली नाही, तर एसटी डेपोचा विचार करा अशी कडवट टीका एसटी कामगारांच्या संघटनांनी केली आहे. शिवाय गोविंदवाडी बायपास सुरू झाल्यावर, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कल्पनेतील शीळ-भिवंडी पूल पूर्ण झाल्यावर कल्याण शहरात येणारी वाहने मोठ्या प्रमाणात कमी होतील. त्यातून स्टेशन परिसरातील कोंडीही कमी होईल, याकडे कामगारांनी लक्ष वेधले आहे.त्यामुळे एसटी बस डेपोचा भूखंड बळकावण्याचा वाद रंगण्याची शक्यता आहे.
कल्याण-डोेंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती संदीप गायकर यांनी डेपो स्थलांतरित करण्याचा विषय मांडला. स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा डेपो स्थलांतरित करावा, तसा तो केला तर स्टेशनच्या दिशेने येणाऱ्या बस शहराबाहेर जाऊन वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल, अशी भूमिका त्यांनी घेतली. खडकपाडा-वायलेनगर येथे बस डेपोसाठी आरक्षित भूखंड आहे. हा भूखंड वापराविना पडून आहे. त्याचा वापर होणे आवश्यक आहे. स्टेशन परिसरातील बस डेपोची जागा आमच्या मालकीची नसली, तरी ती जागा आम्हाला नको आहे. त्यामुळे जागेवर आमचा डोळा असण्याचा प्रश्नच उद््भवत नाही. ते पाहता कामगारांनी विरोध करण्याचे कारण काय, असा सवाल गायकर यांनी उपस्थित केला आहे.
एसटी डेपोचे व्यवस्थापक ई. डी. साळुंके यांच्याकडे डेपो स्थलांतराविषयी विचारणा केली असता त्यांनी सांगितले, डेपो स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. जागा एसटी महामंडळाच्या मालकीची असल्याने या जागेवरुन डेपो हलविणे अथवा त्याच ठिकाणी सुरु ठेवणे हा सर्वस्वी अधिकार महामंडळाच्या प्रशासनाचा आहे. त्यामुळे आम्हाला तरी डेपो स्थलांतराविषयी अद्याप आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडून कोणतीही सूचना आलेली नाही. महापालिका काही करणार असेल, तर महापालिकेसही महामंडळाची मान्यता घ्यावी लागेल.

Web Title: Trying to grab ST Depot space?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.