अॅन्टी करप्शन अधिकारी असल्याची बतावणी करुन ठाण्यात लुटमारीचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 09:58 PM2018-05-03T21:58:20+5:302018-05-03T21:58:20+5:30
अॅन्टी करप्शन अधिकारी असल्याची बतावणी करुन पाच जणांच्या टोळक्याने ठाण्यातील खासगी क्लास चालकाला लुटण्याचा प्रयत्न केला. आपण सीसीटीव्हीमध्ये कैद होत असल्याचे लक्षात येताच या टोळीने तिथून पळ काढला.
ठाणे: अॅन्टी करप्शन ब्युरोचे (एसीबी) अधिकारी असल्याची बतावणी करीत एका खासगी क्लासेसमध्ये येऊन ‘रेड’ चा बनाव करणा-या पाच जणांच्या टोळीविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एसीबीच्या नावाखाली अशी फसवणूक करणारी नेमकी कोणती टोळी कार्यरत आहे, याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ठाण्याच्या तीन पेट्रोल पंप येथील बारावीच्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांची खासगी शिकवणी घेणाºया क्लासेसमध्ये २८ एप्रिल २०१८ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास पाच जणांच्या टोळीने शिरकाव केला. ‘आम्ही एसीबीचे अधिकारी असून क्लासमध्ये तुम्ही अव्वाच्या सव्वा फी घेता, त्यामुळे आम्ही याठिकाणी रेड टाकली आहे,’ असा कांगावा या तथाकथित अधिका-यांनी केला. खाली उभ्या असलेल्या कारमध्ये वरिष्ठ अधिकारी असून क्लासची संपूर्ण तपासणी करायची आहे. त्यामुळे तुम्हाला काही रक्कमही द्यावी लागेल, असाही दावा या अधिकाºयांनी क्लासेसचे मुख्य प्राध्यापक अलवेन जेविन परेझ यांच्याकडे केला. साधारण दुपारी ४.३० पर्यंत या टोळीचे रेड- नाटय सुरु होते. प्रा. अलवेन यांच्या मदतीला क्लासेसचे इतर कर्मचारी आले. शिवाय, त्यांच्यापैकी एकाने सीसीटीव्हीकडे पाहिल्यानंतर इथे सीसीटीव्ही आहे, असे म्हणून या टोळीने तिथून काढता पाय घेतला. नंतर त्यांनी ठाण्याच्या एसीबीच्या कार्यालयात चौकशी केल्यानंतर असे कोणतेही अधिकारी छापा टाकण्यासाठी या क्लासेसमध्ये गेलेच नव्हते, अशी माहितीही उघड झाली. आपली फसवणूक झाली असून कोणीतरी पैसे उकळण्यासाठी हा बनाव केल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी २ मे रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक संजय धुमाळ हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.