वालधुनीत पुन्हा केमिकल टाकण्याचा प्रयत्न
By admin | Published: July 20, 2015 03:15 AM2015-07-20T03:15:58+5:302015-07-20T03:15:58+5:30
वालधुनी नदीत टँकरच्या माध्यमातून घातक रसायन टाकल्याने अनेकांना वायुबाधा झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा याच पात्रात केमिकलने
अंबरनाथ : वालधुनी नदीत टँकरच्या माध्यमातून घातक रसायन टाकल्याने अनेकांना वायुबाधा झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा याच पात्रात केमिकलने भरलेली पाकिटे टाकण्याचा प्रयत्न झाला आहे. हा प्रकार स्वाभिमानी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी पाहिल्यावर त्यांनी लागलीच हा प्रकार रोखला. मात्र, हे केमिकल टाकणारे दोघे पळून गेले आहेत.
अंबरनाथ, एएमपी गेटकडून कल्याण-बदलापूर रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी रात्री एक टेम्पो नाल्याशेजारी थांबला. त्यातील दोघांनी टेम्पोमधील केमिकलची पाकिटे नाल्याच्या शेजारी टाकली. त्यानंतर, ती पाकिटे फोडून नाल्याच्या प्रवाहात टाकण्याचे काम हे दोघे करीत होते. हा प्रकार स्वाभिमानी संघटनेचे उल्हासनगर संपर्कप्रमुख प्रशांत चंदनशिव आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिसला. त्यांनी लागलीच त्या दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते पळून गेले.
त्यानंतर, नाल्याशेजारी ठेवलेली पाकिटे पाहिली असता त्या केमिकलला उग्र वास येत होता. या प्रकरणी चंदनशिव यांनी सहायक पोलीस आयुक्त माणिक बाखरे यांची भेट घेऊ न वालधुनी नाल्यात अशा प्रकारे केमिकल टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)