स्थायी समिती सभापतीसाठी भाजपमध्ये रस्सीखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:16 AM2021-02-21T05:16:02+5:302021-02-21T05:16:02+5:30
मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेतील स्थायी समिती सभापतिपदासाठी २४ फेब्रुवारी रोजी निवडणूक होत असून, भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे, तर ...
मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेतील स्थायी समिती सभापतिपदासाठी २४ फेब्रुवारी रोजी निवडणूक होत असून, भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे, तर उमेदवार देताना जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे की माजी आमदार नरेंद्र मेहता यांचा वरचष्मा राहणार, याकडे लक्ष लागले आहे.
शहरातील भाजप व पालिकेतील सत्तेची सूत्रे हाती ठेवतानाच अनेक पदे भाजपच्या बळावर स्वतःचे साम्राज्य उभारणाऱ्या मेहतांनी भाजपच्या नावाने मात्र इतक्या वर्षात कार्यालय करून दिले नाही, असा आरोप पक्षातूनच सातत्याने होत आहे. त्यातच जिल्हाध्यक्ष म्हात्रे यांनी मेहतांच्या सेव्हन इलेव्हन कंपनीच्या गाळ्यातून जिल्हा कार्यालय हलवत भाईंदर पश्चिम येथे नव्याने सुरू केले. मेहता व समर्थकांच्या विरोधानंतरही त्याचे उदघाटन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. परंतु त्यानंतरही मेहता व समर्थकांनी म्हात्रे यांना व त्यांच्या जिल्हा कार्यालयाला मानत नाही, अशी उघड भूमिका घेतली आहे. मेहता व समर्थक म्हात्रे यांनी सुरू केलेल्या भाजपच्या जिल्हा कार्यालयात फिरकत नाहीत. मेहतांच्या नेतृत्वावर आरोप करत भविष्यात त्यांच्या वादग्रस्त प्रतिमेखाली निवडणूक लढवण्यास अनेक नगरसेवक, कार्यकर्ते तयार नाहीत. त्यामुळे भाजपमध्ये दोन गट झाले आहेत.
आर्थिक समीकरणांसाठी महत्त्वाच्या असलेल्या स्थायी समिती सभापती पदावर आतापर्यंत मेहतांनी पकड ठेवलेली आहे. स्थायी समितीमध्ये भाजपचे १०, शिवसेनेचे ४ व काँग्रेसचे २ सदस्य असून, भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. परंतु पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या मेहतांच्या हाती देण्यास भाजपातून विरोध होत असून, दुसरीकडे मेहता व समर्थक मात्र काहीही करून सभापतिपदाचा उमेदवार त्यांच्या गोटातील असावा, या अनुषंगाने शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.