प्लास्टिक कचऱ्यामुळे तुंबले नाले; दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 12:07 AM2019-06-03T00:07:26+5:302019-06-03T00:07:32+5:30
जरीमरी नाल्यातील कचरा व गाळ काढण्याचे काम सुरू आहे. या नाल्यातील कचरा व गाळ नाल्याशेजारीच काढून ठेवला आहे.
कल्याण : केडीएमसीने बड्या नाल्यांच्या सफाईला सुरुवात केली आहे. अनेक नाले प्लास्टिक पिशव्यांमुळे तुंबले आहेत. नालेसफाईमुळे शहरातील प्लास्टिकबंदीची पोलखोल झाली आहे. काही ठिकाणी नालेसफाई झाल्यानंतर गाळ आणि कचºयाचा ढीग शेजारी रचून ठेवल्याने नागरिकांना नाक मुठीत धरूनच पुढचा मार्ग धरावा लागत आहे.
कल्याण बस डेपोच्या मागच्या बाजूला असलेल्या नाल्यात प्लास्टिक कचºयाचा खच साचला आहे. डेपो परिसरातील सगळा कचरा या नाल्यात टाकला जातो. लक्ष्मी भाजी मार्केटच्या मागच्या बाजूने वाहणाºया नाल्यात बाजारातील सगळा भाजीपाला, पेंढा, फळे, फळांचे लाकडी आणि कागदी बॉक्स असा कचरा टाकला जातो. त्यात प्लास्टिक पिशव्यांचा समावेश आहे. येथे नाल्यात कचºयाचा ढीग असून तो रोज जाळला जातो. त्यामुळे स्टेशनकडे जाणाºया पादचारी व वाहनचालकांना धुराचा त्रास होतो. तसेच या परिसरातील राहणाºया रहिवासी संकुलातील नागरिकांच्या नाकातोंडात धुराचे लोट जात असतात. डोंबिवलीतील मिलापनगरच्या नाल्यातही कचरा साठला आहे. तो अद्याप स्वच्छ करण्यात आलेला नाही. कल्याण पूर्वेतील वालधुनी, विठ्ठलवाडी परिसरातील नाल्यातील कचरा काढण्याचे काम सुरू झाले आहे. हा कचरा नाल्याच्या काठावर काढून ठेवला जात आहे. त्यामुळे गाळ व कचºयाचा ढीग रचला गेला आहे. जरीमरी नाल्यातील कचरा व गाळ काढण्याचे काम सुरू आहे. या नाल्यातील कचरा व गाळ नाल्याशेजारीच काढून ठेवला आहे.
हवामान खात्याचा अंदाज चुकला तर...
हवामान खात्यानुसार मान्सूनचे आगमन लांबले असले, तरी हा अंदाज चुकला आणि पाऊस पडला तर काढलेला गाळ व कचरा पुन्हा नाल्यात जमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे केलेल्या नालेसफाईचा काही उपयोग
होणार नाही.
प्लास्टिकबंदी कागदावरच
राज्य सरकारने २०१८ मध्ये गुढीपाडव्याला प्लास्टिक पिशव्यांविरोधात बंदीचा आदेश काढला. त्यानंतर, केडीएमसीने कारवाई सुरू केली. या कारवाईत सातत्य नसल्याने प्लास्टिक पिशव्यांची छुपी विक्री बाजारात सुरूच आहे. विशेषकरून फेरीवाल्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे.