तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 12:09 PM2024-05-19T12:09:32+5:302024-05-19T12:10:04+5:30
हा मतदारसंघ जिंकून बालेकिल्ला राखा, मी स्वत: गुलाल उधळायला येतो, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
ठाणे : ठाणे हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. येथे १४ पैकी १२ वेळा महायुती जिंकली आहे. त्यामुळे आताची निवडणूक ही करो या मरोची आहे. हा मतदारसंघ जिंकून बालेकिल्ला राखा, मी स्वत: गुलाल उधळायला येतो, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
ठाण्यात शिंदेसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या मेळाव्यात फडणवीस बोलत होते. ते म्हणाले की, ठाण्याची जागा महायुतीच्या सर्वाधिक मताधिक्याने येणाऱ्या जागांच्या यादीत आहे; परंतु त्यामुळे गाफील राहू नका. लोकसभा निवडणुकीत तुमच्या मतदारसंघात कसे व किती मतदान होते त्यावर तुमचे प्रगतिपुस्तक ठरविले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
फडणवीस यांनी भाषणात उद्धव सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा खरपूस समाचार घेतला. उद्धव ठाकरे म्हणतात, ४८ पैकी ४८ जागा जिंकणार. ते ४८ पैकी ४९ जागाही आणू शकतात, अशी खिल्लीही त्यांनी उडविला.
देशाची दिशा कशी असेल ते मोदींनी मुंबईत येऊन सांगितले. पुढील १० वर्षांत भारत कुठे असणार हे सांगण्यासाठी मोदी मुंबईमध्ये आले होते. मोदी नकली सेना म्हणाले, तर उद्धव ठाकरेंना मिरची का झोंबली? तुमको मिरची लगी तो मै क्या करू, असा टोला देखील फडणवीस यांनी ठाकरे यांना लगावला.