वनखात्याच्या पर्यटक कराला तुंगारेश्वर देवस्थानाचा आक्षेप
By admin | Published: January 7, 2016 12:27 AM2016-01-07T00:27:59+5:302016-01-07T00:27:59+5:30
तुंगारेश्वर अभयारण्यात जाण्यासाठी वनखात्याने प्रत्येक पर्यटकाकडून वीस रुपयांचा कर आकारण्यास सुरुवात केल्याने पर्यटकांमध्ये नाराजी आहे
वसई : तुंगारेश्वर अभयारण्यात जाण्यासाठी वनखात्याने प्रत्येक पर्यटकाकडून वीस रुपयांचा कर आकारण्यास सुरुवात केल्याने पर्यटकांमध्ये नाराजी आहे. तर येथील तुंगारेश्वर देवस्थान कमिटीनेही कर वसुलीला आक्षेप घेतला आहे.
तुंगारेश्वर अभयारण्यात प्राचिन शिव मंदिर तसेत बालयोगी सदानंद महाराजांचा आश्रम आहे. दुसरीकडे, पावसाळ्यात याठिकाणी अनेक धबधबे सुरु असतात. निसर्गरम्य परिसर मुंबईपासून अगदी जवळ असल्याने याठिकाणी पर्यटक आणि भाविकांची संख्या वाढत चालली आहे. गेल्या वर्षापासून वन खात्याने पर्यटकांकडून वीस रुपये कर आकारायला सुरुवात केली आहे. त्याला सर्वांनी विरोध केला आहे. आमदार विलास तरे यांनी वनमंत्र्यांकडे कर रद्द करण्याची मागणी केली आहे. पण, त्याकडे दुर्लक्ष करीत वनखात्याकडून कर वसुली सुरु ठेवण्यात आली आहे.
वसईतील तुंगारेश्वर अभयारण्यात असलेल्या प्रसिध्द महादेव मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून वनविभागामार्फत प्रवेश शुल्क आकारणी केली जात असल्याने भाविकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रवेश शुल्क आकारणीमुळे भाविकांची संख्या कमी होत चालली असून देवस्थानाच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होत असल्याची माहिती तुंगारेश्वर देवस्थानाचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांनी दिली.
भाविकांकडून प्रवेश कर आकारणाऱ्या वनविभागाकडून भाविकांना कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात नाहीत. २००२ पासून सरकारने मंदिराकडे दुर्लक्ष केले असून अर्थ पुरवठाही बंद केला आहे. त्यामुळे मंदिराचा खर्च भागवणे आणि भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करुन देताना देवस्थान कमिटीला तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे पाटील म्हणाले.
प्रवेश कर शासन निर्णयानुसार आकारला जातो. तुंगारेश्वर अभयारण्यात भाविकांसह पर्यटक देखील मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे भाविक कोण आणि पर्यटक कोण ही वर्गवारी करणे कठीण असल्याने सरसकट शुल्क आकारणी केली जात असल्याचे, असे वसई वनविभागाचे वनपाल मनोहर अहिरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)