तृतीयपंथीयांसोबत साजरा झाला हळदी-कुंकू समारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 11:56 PM2021-01-15T23:56:03+5:302021-01-15T23:56:20+5:30
मकरसंक्रांतीचे निमित्त
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सर्वांनाच सामावून घेणारा हळदी-कुंकू समारंभ करू या, तीळगूळ देऊन त्यांच्याशीही गोड बोलू या, असा संदेश देण्यासाठी तृतीयपंथीयांसोबत हळदी-कुंकू समारंभ शुक्रवारी साजरा करण्यात आला. समाजाने नाकारलेल्या या घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा प्रयत्न होता. कोपरी येथे हा आगळावेगळा कार्यक्रम पार पडला.
‘तीळगूळ घ्या, गोड गोड बोला’, अशा शुभेच्छा आपण एकमेकांना देत असतो. याच पद्धतीने तृतीयपंथीयांसोबत आपणच गोड का नाही बोलावे, हा या मागचा उद्देश. ‘लोकमत’च्या पत्रकार प्रज्ञा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम झाला. ओपन मॅरेज करणारी भारतातील पहिली तृतीयपंथी माधुरी सरोदे-शर्मा, मुंबई विद्यापीठातून पदवीधर झालेली पहिली तृतीयपंथी श्रीदेवी, कथ्थक नृत्य करणारी तृतीयपंथी श्यामली, मेकअप आर्टिस्ट तृतीयपंथी बॉबी या त्यांच्या घरी आल्या होत्या. यावेळी कविता म्हात्रे, सुभद्रा गायकवाड, सोनाली गायकवाड, विद्या पाटील, रजनी पाटील, सोनाली पोकळे पवार, मंदा शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. सुरुवातीला त्यांच्यावर फुले उधळून त्यांचे औक्षण केले. समाज तुम्हाला स्वीकारतोय, तुम्ही आमच्यात सामील व्हा, हा या कार्यक्रमामागचा हेतू होता. त्यानंतर कुटुंबातील प्रत्येक सदस्याने तृतीपंथीयांना हळदी-कुंकू लावून, त्यांना तीळगूळ, गजरा आणि वाण देऊन संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी पुरणपोळी आणि मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद घेतला.
लोक तृतीयपंथीयांना भीतीपोटी किंवा दयेपोटी पैसे देतात; परंतु त्यांच्यातील माणूस पाहून त्यांना तीळगूळ देण्याच्या हेतूने हा कार्यक्रम आयोजित केले होता, असे कविता म्हात्रे म्हणाल्या.
तृतीयपंथीयांच्या मंडळातर्फे हळदी-कुंकू कार्यक्रम होत असतो; परंतु सामान्य कुटुंबाने घरात बोलवून हा मान दिला, हे पहिल्यांदाच घडले आहे. तृतीयपंथीयांना एकत्र करून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण आम्हाला करायचे आहे. त्यासाठी ‘द्या टाळी’ हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. या समारंभात आम्हाला निमंत्रण देऊन जो मानसन्मान दिला त्याबाबत म्हात्रे कुटुंबाचे आभार.
-माधुरी सरोदे-शर्मा, तृतीयपंथी
ज्यावेळी मला या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले, त्यावेळी मला खूप गहिवरून आले. समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याची ही पहिली पायरी आहे. आजही आम्हाला समाज
दुर्लक्षित करीत आहे. आम्हाला तुमच्यात सामील करून घ्या.
-श्रीदेवी, तृतीयपंथी