10 रुपयांना साडीचा सेल पोलिसांनीच बंद पाडला, महिलांची होती मोठी गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2019 12:35 AM2019-06-09T00:35:58+5:302019-06-09T00:37:47+5:30
उल्हासनगरची घटना । साडीखरेदीसाठी झुंबड
सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील एका दुकानदाराने १० रुपयांत साडीचा सेल सुरू करताच खरेदीसाठी महिलांनी एकच गर्दी केली. गर्दीमुळे अनुचित प्रकार होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलिसांनी दुकानदाराला सेल बंद करण्यास भाग पाडले. उल्हासनगर कॅम्प नं.-२ परिसरातील एका दुकानदाराने १० रुपयांत साडी असा सेल तीन दिवसांपूर्वी लावला होता. साडीखरेदीसाठी ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, ग्रामीण परिसर, शहापूर, मुरबाड येथून येऊन महिलांनी एकच गर्दी दुकानासमोर केली. गर्दी हाताबाहेर जाण्याची माहिती दुकानदाराला पोलिसांनी दिली. महिलांच्या गर्दीमुळे अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, म्हणून सेल बंद करण्यास पोलिसांनी दुकानदाराला बजावले. तसेच दुकान उघडू नको, अशी तंबी दिली.
वाढत्या गर्दीमुळे दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला. दुकानदाराने प्रत्येक महिलेला फक्त पाच साड्या खरेदी करा, असे सांगितले. ही बातमी वृत्तवाहिन्यांवर दिसल्याने जिल्ह्यातून महिलांची झुंबड उडाली होती. मात्र, या गर्दीमुळे अखेर दुकानदाराला साड्यांच्या सेलसह काही दिवस दुकान बंद करण्याची वेळ आल्याची माहिती पोलिसांनी दिली. साडीचा सेल बंद केल्याने खरेदीसाठी आलेल्या महिलांनी नाराजी व्यक्त करून दुकानदाराने सेलच्या नावाने फसवल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
पहिल्यांदाच असा प्रकार
उल्हासनगरमध्ये कपड्यापासून ते फर्निचरपर्यंतचे मार्केट आहे. होलसेल मार्केट असल्यामुळे राज्यातून नागरिकांबरोबरच विक्रेतेही येथे येत असतात. साधारण १०० रूपयाला एक असा दहा साड्यांचा गठ्ठा विकला जातो. मात्र १० रूपयाला साडी विकण्याचा प्रकार शहरात प्रथमच झाल्याचे सांगण्यात आले.